Munnar Diary (Day-2)

देवीकुलम बेसकॅम्प ते अनईरंगल डॅम आणि परत (40 KM)

काल भल्या रात्री कॅम्प मध्ये पोहचलो होतो.. त्यामुळे आजूबाजूला नक्की काय आहे.. ग्रुप मध्ये कोण आहे.. आजचा काय प्लॅन आहे.. काही काही कल्पना नव्हती. पण एक गोष्ट पक्की माहीत होती की मी YHAI सोबत आहे.. त्यामुळे जे असणार ते भारीच असणार. आज सकाळी (आपोआप) 6ला जाग आली. उठून फक्त ब्रश केला (आंघोळीची अपेक्षा आणि प्रश्नच नव्हता) आणि कॉफी अधिक नाश्ता हाणला. मग सांगितलं गेलं की दुपारचं जेवण आपल्या आपल्या डब्ब्यात भरून घ्यायचं आहे.. आणि इथं माझ्या डोक्यात प्रकाश पडला की मी तर डबा वगैरे आणलाच नाही.. मग काय नाश्ता करताना झालेल्या मैत्रीने सिद्धूच्या डब्ब्यात जास्त जेवण भरलं आणि दुपारीची रसद तयार केली. हळू हळू बेसकॅम्प सोडेपर्यंत व्यक्ती, वल्ली, नमुने सारे सारे उजेडात दिसायला लागले होते.. भाषा, सूर, गप्पा जुळायला लागल्या होत्या. लगेच दोनच चाकाची पार्टनर पण मिळाली आणि या देहाला पूर्णत्व प्राप्त झालं. आम्ही सर्वस्वी सज्ज झालो मुन्नार फिरस्ती साठी. आजचं अंतर खरतर पहिल्या दिवसाच्या मानाने खूप जास्त होतं. जाऊन येऊन 40km आणि ते ही मुन्नार मध्ये.. पण मी तसा रिल्याक्स होतो.. कारण इच्छा, तयारी आणि सोबत असेल तर अंतर काही असलं तरी फरक पडतं नाही. आणि माझ्याकडे त्या तिन्ही गोष्टी पोटभर होत्या.

सकाळी ठीक 8 वाजता फ्लॅग दाखवून आमची ride सुरू झाली.. आधी प्रत्येक जण आपल्या आपल्या स्पीड ने सायकल चालवत होता.. मग कधीतरी लिडर च्या सूचनेनुसार एकत्र थांबत होता.. रस्ते चाचपत होता.. थांबल्यावर ओळखी होत होत्या.. आणि हो हिरवं हिरवं गार गार मुन्नार डोळ्यात आणि श्वासात साठवत होता. हळू हळू रस्ता जसा पुढे जाऊ लागला तसं काही वल्ली जवळ आल्या.. गप्पा झाल्या.. हसणं खिदळण, ओरडणं झालं आणि आपोआप एक मित्रांचा ग्रुप तयार झाला.. आणि मुन्नार वाला प्रवास हा अजून हिरवागार झाला. आज दिल्लीचा जितू, मुंबई चे सिद्धू, गुजरात चा राकेश, बंगलोर चा जय, हैद्राबाद चे सृजन जी आणि कर्नाटक चे जॉन असा भन्नाट फॉर्म्युला तयार झाला आहे. त्यामुळे होणाऱ्या गप्पा इतक्या वेग वेगळ्या आणि भन्नाट असतात की मजा येतेय. त्यात thanks to airtel.. मोबाईल ला अजिबात नेटवर्क नाहींये.. म्हणून जे जगतोय ते आता आणि इथेच जगतोय, आभासी जगात नाही. आज जातानाच्या 20 km मध्येच रस्त्याने बरेच रंग दाखवले होते.. पक्का मख्खन रस्ता, काम चालू असलेला खडीदार रस्ता, ट्राफिक वाला रस्ता, जबरदस्त उतार वाला रास्ता आणि जीव काढेस्तोवर चढणार रस्ता.. त्यामुळे जातानाच पूर्ण 360 अंश मजा येत होती.. आणि येताना होणाऱ्या अनुभवाची कल्पना ही येत होती.. पण आम्ही निवांत होतो.. फोटो काढत आणि गप्पा झाडत आम्ही दुपारी 2ला अनईरंगल डॅम गाठला.. तिथे मोक्कार टाईमपास आणि सकाळी घेतलेली रसद संपवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..


आणि इथे सुरू झाली खरी सायकलिंग वाली परीक्षा.. कारण येताना मज्जा केलेले चढ आता जीव काढू लागले होते.. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या क्षमतेने आणि गियरने पेडलिंग करत होता. मी, जितू, सिद्धू आम्ही जवळ जवळ पूर्ण वेळ एकत्र होतो.. रमत गंमत.. जमेल तिथे स्वतःला पुश करत.. फोटो विडिओ काढत अंतर कपात होतो.. पण तरीही 2-3 वेळा फारच हवा टाईट झाली होती.. पण मनाशी ठरवल्याप्रमाणे सायकल हातात घेऊन काही ढकलली नाही.. खूप ब्रेक्स घेतले.. वाटेने अप्रतिम गॉड नारळपाणी, मलई हाणली.. दर्जेदार कॉफ़ी हाणली.. फोटो काढले.. आणि साधारण 5ला आम्ही कंपसाईत गाठली.. 

आमच्या आधी तोवर 12-15 जण पोहचले होते.. प्रत्येक जण सांगत होता आम्ही टू फिफ्टीन ला पोचलो, थ्री ओ क्लॉक पोचलो.. पण आम्ही फ्रेश आणि चिल्ल होतो. मुन्नार मध्ये सायकलिंग करण्याची अजून एक गंमत आहे.. ती म्हणजे तुम्हाला गरम वगैरे होताच नाही.. दुपरीसुद्धा थोड्या सावलीत उभं राहिलं की तुम्हाला थंडी वाजते.. गार वाटत.. त्यामुळे खूप थकायला असं होतं नाही.. पण तरी आल्यावर.. थेट गारेगार पाण्याने अंघोळ केली.. (उद्या ते ही मिळेल की नाही माहीत नाही.. त्यामुळे जिथे चान्स मिळेल तिथे उरकलेली बरी) मग मात्र एकदम हलकं वाटलं.अंघोळ करून बाहेर येउस्तोवर गरम गरम भजी आणि कॉफी तयार होती. मग गप्पा, पत्ते आणि भजी कॉफी वर निवांत ताव मारला. तोवर मागे राहिलेल्या चार जनांपैकी 2 जण कसेबसे सात वाजता अवतरले होते. त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. बाकी दोघाना शोधायला रिक्षा पाठवला गेला.. त्यांना रिक्षातून बेसकॅम्प ला आणलं गेलं आहे. त्यांना सायकलिंग झेपत नसेल तर उद्या कदाचित त्यांना शाल श्रीफळ देन्यात येईल (घरी पाठविण्यात येईल.. करण रोज रोज रिक्षा पाठविण्यात काही पॉईंट नाही). संध्याकाळी मग जवळ च एक अय्यपन मंदिर होत तिथे चक्कर मारली.. आता जेवणानंतर बराच वेळ गप्पा चालल्या होत्या.. पण आपल्या आपल्या गोधडीत शिरून.. करण थंडी फारच बोचरी आहे.. आता गप्पा अलगद थंडीत विरघळून चालल्या आहेत.. आणि शब्द विरहित सूर आजूबाजूला घुमू लागले आहेत.. घोरण्याचे.. चला मीही करतो सुरू प्रयत्न..

झोपण्याचा बरं का..

फिरस्ती
26.12.2021








Click on the link below to read previous Munnar Diary:

Munnar Diary (Day - 1)
https://www.firasti.in/2021/12/munnardiary-day-1.html

Comments

  1. Good to recollect all the memories Anand ji. Though I do not know Marathi I'm using Google translate to read your blogs. Waiting for next blogs :)

    ReplyDelete
  2. मस्त जोरदार. Eagerly waiting for the next👍👍

    ReplyDelete
  3. जबरदस्त आनंद,खुंप छान वर्णन केलस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts