Munnar Diary (Day-3)

 


देवीकुलम ते कुंडला टी इस्टेट
(32 KM)

काल चाळीस किलोमीटरची दौड मारल्यानंतर आज कुणी उठेल असं वाटत नव्हतं.. पण आज सगळे वेळेआधीच तयार होऊन बसले होते.. पण YHAI कडूनच कॉफी आणि नाश्त्या यायला थोडा उशीर झाला. तो आल्यावर सगळे त्यावर तुटून पडले आणि पटकन दुपारचं जेवण पॅक करून तयार झाले. पण पुन्हा फ्लॅग दाखवणं वगैरे यात बराच वेळ गेला.. हँडल वरचे हात आणि पॅडल वरचे पाय नुसते शिवशिवायला लागले होते.. जसा झेंडा दाखवला तस अत्यंत तुरंत आम्ही सायकल दामटली.. आज कालच्या मनाने जरा कमी अंतर होतं. पण चकव्या रस्त्यांचा विचार करता सगळेजण चांगल्या स्पीड ने पुढे चालले होते.. आणि गम्मत म्हणजे मुन्नार पर्यंत पूर्ण डाऊनहील होत..म्हणजे पूर्ण सात किलोमीटर उतार.. अहाहा गजब उतार होता.. मजा आली.

पण मुन्नार पासून माटूपट्टी डॅम च्या दिशेने जाणारा रस्ता मात्र एकदम अरुंद होता.. त्यात इतकं जास्त ट्राफिक होतं की सायकलिंग करायला वैताग येत होता. पण ऑप्शन नव्हता.. येणारी जाणारी वाहनं सांभाळत.. रस्त्याचे चढते-उतरते-वळते मुड सांभाळत आम्ही चांगल्या वेगात माटूपट्टी डॅम गाठला. डॅम आणि त्याच बॅकवॉटर मस्तच होतं पण त्या सोबत अरुंद रस्त्यावर असलेली गर्दी मात्र किचकट होती. त्यामुळे जास्त वेळ काही तिथं थांबणं शक्य नव्हतं.. पाणी, चिक्की बिक्की घेऊन आम्ही पुढं निघालो आणि जरा चढ चढून एक मस्त जागी थांबलो. तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की बत्तीस किलोमीटर पैकी 22 किलोमीटर आम्ही दुपारी 12 लाच पार केलं होतं. त्यामुळे आता बाकी राहील होतं फक्त 10 किलोमीटर.. मग काय, सगळ्यांनी ठरवलं की दुपारचं जेवण थेट पुढल्या कॅम्प साईट वर जाऊनच करायचं (आम्ही हे ठरवलं तेव्हा YHAI चा कॅम्प लिडर गालात हसत होता). पुढे थोडं गेल्यावर एक दणदणीत कच्चा रस्ता लागला.. थेट चहाच्या माळ्यातला गाडीरस्ता. चुकून माकून त्यात एखादा डांबरी पॅच असायचा.. बाकी नुसती खडी, माती, वळणं आणि तुफानी उतार.. वाह भाई वाह. हँडल वरचे ब्रेक आवळून आणि नजर रस्त्यावर घट्ट गाडून उतार उतरलो. आणि खाली पोचलो तेव्हा काही जण मस्त छोटुश्या नदी पात्राच्या बाजूला हिरवळीवर पहुडले होते.. काही जण जेवत होते काही जण सनबाथ घेत होते. कॅम्प लिडरने आम्हाला सांगितलं पुढे फक्त तीन किलोमीटर बाकी आहे तुम्ही ही जेवून घ्या.. मग काय लईच निवांत मस्त डबे फस्त केले. नंतरही बराच वेळ हेल्मेट ची उशी करून हिरवळीवर ताणून दिली.. अर्धा तासाने.. म्हटलं चला पटकन तीन किलोमीटर जाऊ आणि अंघोळ करू.

पण शेवटचं तीन किलोमीटर मात्र.. आरा रा रा रा खतरनाक होते.. पूर्ण च्या पूर्ण चढ.. आणि जसा रास्ता उतरलो होतो अगदी तसाच रस्ता.. काय रे देवा. या रस्त्यावर चढण म्हणजे पूर्ण गियर डाऊन करावे लागत होते.. पण त्यामुळे जेव्हा थांबल्यावर पुन्हा सायकल वर चढायची वेळ यायची तेव्हा वाट लागायची.. कारण, खडी आणि चढामुळे बसताच यायचं नाही. प्रत्येक चौथ्या पाचव्या झाडाखाली थांबत थांबत तासाभराने आम्ही तीन किलोमीटर संपवलं. आणि जेव्हा कॅम्प साईट पहिली तेव्हा मनात आलं वाह.. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच..!! समोर आणि मागे चहाच्या झाडांचे डोंगर. त्यात ज्या घरात आमची राहायची सोय आहे त्याला जाण्यासाठी एक अरुंद जुनाट लाकडी पूल.. घराच्या दारात हिरवळ.. आणि त्या हिरवळीवर पहुडलेल्या सायकली आणि आम्ही.! अजून काय हवं एखाद्या फिरस्त्याला. गेल्यागेल्या अंघोळ केली (टॉवेल, कपडे वगैरे काही ही जवळ नसताना) आणि निवांत हिरवळीवर लेटुन दिल. थोड्यावेळाने मग जरा कंटाळा आल्यावर जवळच्या टेकडीवर मस्त तासाभराचा ट्रेक केला. आणि येऊन मस्त गरमा गरम चहा घेतला. त्या नंतर आता बराच वेळ गप्पा टप्पा चालू आहेत.. जेवणही झालाय..आज थंडी थोडी कमी आहे.. उद्या तसं अंतर ही थोडं कमी आहे.. पण शेवटचे दोनच दिवस उरले आहेत.. so, बनलेली मैत्री गप्पांमधून घट्ट होते आहे.. नव्या भाषेसोबत,  जागांसोबत.. आठवणींच्या स्वरुपात..

- फिरस्ती
27.12.21





Click on the link below to read previous Munnar Diaries:

Munnar Diary (Day - 1)

https://www.firasti.in/2021/12/munnardiary-day-1.html


Munnar Diary (Day - 2)

https://www.firasti.in/2022/01/munnardiary-day-2.html


Comments

Popular Posts