कोवि-स्पेसडायरी

नुकतचं, RTPCR नामक आंतराष्ट्रीय चाचणीत माझी कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त सकारात्मक (Positive) आली. आणि मला एक सात दिवसीय अंतराळ सफर करण्याची नामी संधी मिळाली. (वाहणाऱ्या नाकाची ओलसर कृपा दुसरं काय)

चाचणीचा निकाल आल्या आल्या मी TMC स्पेसस्टेशनशी संपर्क साधून माझी अंतराळ सफर बुक केली. आणि पुढील अर्धा तासात - किंचित फुसफूसणारं नाक, एक गडबडीत कोंबलेली बॅग आणि आकंठ काळजीत बुडालेली बायको घेऊन मी ठाणे महानगरपालिकेचं CoviSpace station गाठलं.. स्पेस स्टेशनला गेल्यागेल्या PPE स्पेससूट घातलेल्या काही अंतरळवीरांनी (Astronautsनी) माझं मनःपूर्वक स्वागत केलं. प्राथमिक चौकशी नंतर बायकोला बाहेर थांबविण्यात आलं.. आणि मला काही महत्वपूर्ण तपसण्यासाठी अतिशय थंड अश्या आय.सी.यू. दालनात नेण्यात आलं. त्या दालनात माझ्या आजूबाजूला आणखी ही भाग्यवान (?) पण बावरलेले सहप्रवासी होते (म्हणजे मी काही एकटाच भाग्यवान विजेता नव्हतो). दालनात प्रत्येकाची कोण लगबग उडाली होती.. कुणाचे सारखे फ़ोन वाजत होते.. कुणाची इकडं तिकडं धावपळ चालली होती.. कुणी सारख सारख स्पेससूट धारक अंतराळवीरांना प्रश्न विचारत होतं.. कुणी स्वतःशीच बडबडत होत तर कुणी शेजाऱ्याशी बोलून धीर एकवटत होतं. मी मात्र त्या थंड दालनात प्लास्टिकच्या खुर्चीवर शांत बसून आजूबाजूच्या सहप्रवाश्याना न्याहाळत होतो. प्रत्येक जण वेगळा होता.. कुणी अंतराळ सफरीसाठी मोठी बॅग भरून 'तयारीने' आला होता, कुणी नुसता फिरायला आल्यासारखा बरमुडा घालून आला होता, कुणी एकट आलं होतं तर कुणी नवरा बायको कपल टूर वर आले होते... एकंदर संपूर्ण दालन नुसतं गजबजलेल होतं. थोड्यावेळाने मला त्या दालनात अगम्य आणि संगणक जोडलेल्या बेडवर झोपविण्यात आलं. मला तर वाटलं आता सहा महिने इथं चीर निद्रेत झोपवतील आणि पुढचा महत्वाचा ग्रह म्हणजे गुरू किंवा शनी आला की जागं करतील. पण तसं काहीच झालं नाही (नंतर मला कळलं की ते फक्त स्पेस स्टेशन होतं, अंतराळ यान नव्हतं). काही वेळाने मला अद्भुत चिमटे जोडण्यात आले आणि संगणकावरील आकड्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. त्या नोंदीचं ठरविणार होत्या मला Covispace यानात नेमकं कुठे स्थान मिळणार आहे. साधारण 7-8 जणांच्या तपासण्या झाल्यानंतर मला Covispace यानात प्रवेश मिळाला. आम्हाला एका छोट्याश्या गाडीने Covispace यानातील तिसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. आणि इथेच आमची पहिल्यांदा ओळख झाली आमच्या पुढील सफरातील महत्वपूर्ण गोष्टीची.. ती म्हणजे आमच्या अंतराळयानाशी (Spaceship शी) - T.M.C.Covispace 0601.

ते पाहूनच तोंडातून शब्द आला.. अद्भुत.! कारण यानाच्या फक्त एका मजल्यावर जवळ जवळ 250 ते 300 जण सहज मावू शकतील एवढी हवेशीर जागा होती.. आणि संपूर्ण यान अगदी चका-चक स्वच्छ होतं. शिस्तबद्ध शयन व्यवस्था, पूरेसे स्वच्छता (शब्दशः)गृह, तितकेच नेटके स्नानगृहे, त्यात 24X7 गरम जल प्रवाह, पिण्यासाठी फिल्टर जल, प्रत्येक बेड नजीक ऑक्सिजन पाईपलाईन, एक (चक्क चालू) टेबल फॅन,  पांढरी शुभ्र बेडशीट (with मऊ मऊ उशी) आणि प्रत्येक बेडजवळ स्वतंत्र 2-2 जीवनावश्यक चार्जिंग पॉईंटस.. एखाद्या अंतराळ प्रवाशाला अजून काय हवं?

थोडा वेळ वाट पाहिल्यावर काही अंतरळवीरांनी माझी जुजबी माहिती विचारली आणि एक सुसज्ज बेड माझ्या हवाली केला.. बेड नं.3311..!! सुरुवातीचे एक ते दोन दिवस मी फक्त आणि फक्त यानाचं, व्यवस्थेचं, वातावरणाचं आणि सहप्रवाश्यांच निरीक्षण करण्यात घालवले. माझ्या शय्येलगत जवळ जवळ 15 बेड्स होते.. काही हळू हळू खोकणारे, काही उबळ आली की मोठ्याने खोकणारे, काही अगदी शांतपणे मोबाईलमध्ये बुडालेले, काही कृत्रिम ऑक्सिजन नाकाला लावून जुनी मराठी गाणी ऐकणारे.. आणि काही माझ्यासारखे काही ही त्रास नसताना फक्त अंतराळ सफरीवर आलेले. एकूण काय, यान अगदी गमतीशीर होतं. साधारण प्रत्येक 3-4 तासांनी PPE धारक अंतराळवीर येऊन आमची चौकशी करत होते.. आमच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण तपासत होते, शरीराच्या तापमानाच्या नोंदी ठेवत होते, आणि अगदी आपुलकीने चौकशी करीत होते. पहिल्या दोन-तीन दिवसांनंतर काही प्रवाशांनी अगदी नवाच उपक्रम चालू केला.. ते म्हणजे अगदी निरागस चेहरा करून "एक" प्रश्न विचारून त्यांनी अंतराळवीरांना भंडावून सोडलं.. अगदी सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र कधीही अंतराळवीर दिसला की त्यांचा "तो" प्रश्न तयार असायचा.. स्वच्छता गृहाकडे जाताना, तिकडून येताना मध्येच थांबून "तो" प्रश्न विचारला जायचा.. "तो" प्रश्न होता.. "आमची तब्यात मस्त आहे.. आम्हाला पृथ्वीवर कधी सोडणार??". यावर त्यांचं उत्तर असायचं.."आमचं काम तुमच्या तब्यतीची काळजी घेणं आहे आणि इथं आणण, इथे ठेवण, सोडणं या बाबतचे सर्व निर्णय स्पेसस्टेशन वरून घेतले जातात." असं उत्तर ऐकल्यावर बिचारे हिरमुसुन जात होते. पण मग जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसे हे प्रश्न कमी होऊ लागले.. आणि आजूबाजूच्या प्रवाश्यांसोबत गप्पा गोष्टींमध्ये वेळ अगदी मजेत जाऊ लागला.

कोविस्पेसशीप मधील आमची दिनचर्या फारच मजेशीर आरामदायी होती.. सकाळी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही उठू शकत होता.. अंघोळ कधी करायची किंवा करायची की नाही याबाबत कसलाही नियम नव्हता.. उठल्यावर साधारण 9 वाजता तुमच्या बेडवर नाष्ता आणि चहा येत होतं.. त्यांनतर यानाच्या नियमानुसार तुम्हाला औषध घ्यावी लागत होती.. साधारण 11 वाजता एक कप दूध येत होतं.. दुपारी 2 वाजता अगदी पृथ्वी सारख जेवण मिळत होतं (चवदार आणि पोटभर), संध्याकाळी 4/5 दरम्यान चहा बिस्कीट, आणि रात्री 8/9 दरम्यान जेवण आणि औषध.. असं सकस आणि फक्कड वेळापत्रक होतं. या संपुर्ण वेळापत्रकात अधे-मधे जो प्रचंड मोकळा वेळ मिळत होता त्यात आम्ही फोना फोनी, गप्पा टप्पा, लोळालोळी आणि चिक्कार टूक्कार चित्रपट पाहत होतो. एकंदर अगदी दृष्ट लागावा असा वेळ चालला होता.. काही दिवसांनी आमच्यातल्या एकाने एक संशोधन केलं आणि आम्ही थेट पृथ्वीवरून पिझ्झा, बर्गर वगैरे मागवू लागलो.. त्यामुळे आमची जीभ काहीतरीच खुश झाली. माझ्या बाजूच्या बेडवर एक दादा होते.. त्यांच्या सासूबाई याच स्पेसशिप मध्ये कामाला होत्या.. त्यामुळे आम्हाला "उद्या" सकाळी नाश्त्यामध्ये काय येणार आहे, चहा सोबत कोणतं बिस्कीट मिळणार आहे इत्यादी टिपा आधीच मिळत होत्या. त्यात नाश्त्याला जर बटाटे वडा, पावभाजी असं काही येणार असेल तर आम्हाला रात्रीच नाष्टा करायची इच्छा होत होती.. एकूण काय तर स्पेसशिपशी आणि तिथल्या वातावरणाशी आम्ही (आनंदे)एकरूप झालो होतो.

अश्यातच एक दिवशी आम्हाला कळलं की, ही अंतराळ यात्रा फक्त सात दिवसाचीच आहे.. आणि उद्या आपली सुट्टी होणार आहे.. मग काय काही जण नुसते आनंदाने टूनटून उड्या मारायला लागले, कधी अंघोळ न करणारे चक्क अंघोळ करून आले, पसारा सम्राट चक्क पसारा व्यवस्थित आवरून ठेवू लागले, मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मोक्कार गप्पा झाडू लागले.. पण यात माझ्यासारखे काही जण मात्र शांत होते.. आणि आतल्या आत उद्या पृथ्वी वर उतरल्यावर इतकी "ऐश" नसणार म्हणून मनातच खट्टू झाले होते. कारण, कितीही अराम करायचं म्हटलं तरी पृथ्वीवर बेडवर काही कोणी जेवायला देत नव्हतं.. त्यामुळे स्पेसशिप बाहेरच्या कष्टकरी जगाशी जुळवून घेणं मला थोडं अवघड जाणार होत.. तरी त्या जगाची सवय व्हावी म्हणून मी शेवटचे दोन दिवस Work-From-Spaceship केलं. कामावरील जनतेस याचं खूप अप्रूप वाटलं.. पण मला माहित होतं.. ही अंतराळ सफर तर आता संपणार आहे.. आणि नन्तर आपल्याला हेच करायचं आहे. पण एकंदर Work-From-Spaceship मध्ये देखील फार काही ताण पडला नाही आणि दोन दिवसही अगदी हवेशीर गेले.. आणि एके दिवशी रात्री एक मोठे अंतराळ वीर आले.. आमची चौकशी केली.. आणि म्हणाले.. "उद्या अकरा वाजता तुम्हाला पृथ्वीवर परत पाठविण्यात येईल..""

आणि शेवटी तो दिवस आला.. सकाळी ठीक नऊ-दहा वाजताच आम्ही तयार होऊन बसलो होतो..  पण काही तांत्रिक अडचणीमुळे आणि अंतराळवीरांच्या अपेक्षित दिरंगाईमुळे सकाळी अकराचे दुपार दोन वाजले. आजूबाजूचे (पृथ्वी वर जाण्याची परवानगी न मिळालेले) सहप्रवासी आमच्याकडे बघून हसत होते.. शेवटी त्यांचं जेवण आलं आणि अखेर आम्हाला पृथ्वी साठी रवाना करण्यात आलं.. (आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत पाहत च तिसरा मजला सोडला). यानात येताना आम्हाला गाडीत बसवून आणलं गेलं होतं.. आणि परत जाताना मात्र आम्हाला तीन मजले चालत उतरविण्यात आलं.. (याचा अर्थ हाच की - आम्ही खूप ठणठणीत झालो आहोत आणि स्पेस प्रवासात आम्हाला नवीन शक्ती प्राप्त झाल्या आहेत). खाली स्पेस स्टेशनला उतरल्यावर आमच्या नावाचं एक कार्ड आम्हाला देण्यात आलं.. आणि गुड बाय करण्यात आलं..

आम्ही साऱ्या बेड-मेट्स नी TMC स्पेस-स्टेशन बाहेर आल्यावर एक सेल्फी घेतला. आणि पृथ्वी वरील आपल्या आपल्या "स्पेस" मध्ये पुन्हा प्रवेश केला.. एक अनोख्या अनुभवसाहित..


धन्यवाद..!!

तुमचा अंतराळ-अनुभवीर,

आनंद 😊



(टीप - कोविड हा एक आजार आहे. प्रत्येकाने हा आजार होऊ नये म्हणून जी काळजी घेणं गरजेचं आहे ती घ्यायलाच हवी. आणि तरीही जर तुम्हाला हा आजार झालाच, तर घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि उपचारांनी तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. वरील लेख हा माझ्या अनुभवला कल्पनेची फोडणी देऊन तयार केलेला एक प्रयोग आहे. वाचा आणि आनंद घ्या.

आणि हो.. मी पूर्णपणे बरा, ठणठणीत आणि आनंदी आहे 😊)

Comments

  1. खूप सुंदर रित्या हा अनुभव तू शेअर केला आहेस. कोणाला कोविड झाला तर तुझें हे अनुभव वाचून च तो बरा होईल आणि कोवीड सेंटरला जाण्यासाठी घाबरणार नाही.
    Please take care

    ReplyDelete
  2. आनंदा... हे फक्त तूच करू शकतो मित्रा🤩😍😄 चेहऱ्यावरंच हास्य एक सेकंद ही गेल नाही😍 तुझ्या कल्पनाशक्तिला आणि तुझ्यातील प्रयोगशील लेखकाला सलाम💐🌹💐

    ReplyDelete
  3. एकदम भारी, तुझ असल काही विनोदी वाचायला मिळणं हा एक वेगळाच अनुभव असतो, माणूस स्वतःला त्याच्याशी रिलेट करतो, मी ही त्या अंतराळ यानाची सफर करून आल्यासारखं वाटायला लागलं 😂

    ReplyDelete
  4. Wowwww....kiti chan lihlay...khupch bhari...

    ReplyDelete
  5. एक नंबर ह्या विषयी जबरदस्त असे सकारात्मक भूमिका मांडली आणि वाचल्यावर असे वाटत होते की नक्कीच अंतराळात जाऊन आल्या सारखे फील तयार केले.

    ReplyDelete
  6. प्रत्येक गोष्टी मध्ये positive दृष्टीकोन ठेवून विचार करत त्यातला आनंद फक्त तूच घेऊ शकतो... तुझ्याशी बोलले किंव्हा तू तुझ लिखाण वाचले तरी एक वेगळी जादू संचारते आणि आपण पण अस जगले पाहिजे असं वाटते..

    माझा आदर्श - आनंद दादा... काळजी घे. .आराम कर ..

    ReplyDelete
  7. आनंद मस्त लिहिलंय... काळजी घे

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts