Munnar Diary (Day-4)
कुंडला टी इस्टेट ते पम्भाटी शोला
(15KM)
काल रात्रीशिवाय आजची सुरुवात होणे निव्वळ अशक्य आहे.. काल रात्री आमच्या batch मध्ये एक प्रकरण झालं.. ते नेमकं काय वगैरे सांगणं योग्य नाही पण त्यात दोन जणांना रात्रीच कॅम्प मधून बेदखल करण्यात आलं. पण हे सारं प्रकरण चालू असताना पूर्ण कॅम्प मध्ये जो काही धुमाकूळ चालू होता तो "गझब" होता. एकाच वेळी एकाच रूम मध्ये मल्याळम, तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषेत तुफान गडबड कम् सिरीयस कम् हशा उसळला होता. तो इतका अभूतपूर्व आणि अवर्णनीय होता की कमाल..!! शेवटी 11 वाजता वगैरे प्रकरण वाल्या दोघाना बेदखल केलं गेलं आणि नाटकावर पडदा पडला.. (पण नाटकाची चर्चा अजूनही चालूच आहे)
तर आज सकाळी देखील सगळे उठून वेळेआधीच तयार होते. नाश्ता यायला थोडा वेळ होता त्यामुळे मग आम्ही पाच सहा जण जवळच असलेल्या गावात चक्कर टाकून आलो. तिथे असलेल्या खुज्या घर वजा हाटेलमध्ये चहा आणि किंचित नाष्टा उरकला. आणि सकाळ सकाळ च कोवळं ऊन चाखत चाखत परत कॅम्प साईट गाठली. तिथं ही YHAI कडून नाश्ता आला होता.. इडली, चटणी, सांबर आणि खीर.. मग काय पोट थोडं सैल केलं आणि पुनश्च नाष्टा भक्षण केलं. पुढे मग तुरंत पॅक लंच घेऊन कॅम्प साईट सोडली. आजच अंतर अगदी म्हणजे अगदीच कमी होत ते म्हणजे 15 किलोमीटर. त्यामुळे काहीच घाई नव्हती.. रमत गंमत गप्पा टप्पा करत करत सायकलिंग चालू होतं. अंतर कमी असेल तरी आम्ही गाफील मात्र नव्हतो करण कालच शेवटचा 3 किलोमीटर चा पॅच अजून लक्षात होता. आजचा रस्ता हा गेल्या चार दिवसातील माझा सगळ्यात आवडता रस्ता होता. कारण सुरुवातीचा काही भाग सोडल्यावर आम्ही थेट जंगलात प्रवेश केला. उंच उंच झाड..दोन चाकांची ओलसर पायवाट..त्यावर पानांचा खच..आजूबाजूला अधूनमधून दर्शन देणारी वानर.. आणि सायकली पिटाळणारी आम्ही काही कार्टी.. मस्तच होतं.. जंगल फारच सुंदर होतं. पण पुढे गेल्यावर रस्त्यालगत लाकड्यांच्या ओंडक्यांचे ढीग पाहिले आणि मनापासून वाईट वाटलं. कारण ते ढीग पाहता जंगलतोडीचा अंदाज येत होता.. खरच कधी थांबवणार आहोत आपण हे सारं, यार ? कधी ?
असो, तिथून बाहेर पडेपर्यंत चहाचा मळा चालू झाला होता.. रस्ता रमत गमत पण वर चढायला लागला होता.. पण दोन्ही बाजूंला नजर जाईल तिथपर्यंत फक्त चहाच चहा होता. आणि सोबत होता एक विलक्षण गारवा.. ज्यामुळे थकायला अजिबात होत नव्हतं. चहा मळा संपल्यावर एक गर्दीत गुदमरलेला टुरिस्ट पॉईंट लागला.. तो झटकन मागे टाकून आम्ही आजची कॅम्प साईट गाठली.. वेळ होती साधारण 1वाजता. आज आमचा मुक्काम आहे "फॉरेस्ट" च्या गेस्ट हाऊस मध्ये. त्यामुळे लोकेशन फारच मोक्याच आहे आणि सुरेख आहे. साईट च्या समोर आहे उंच डोंगर आणि बाजूला आहे हिरवंगार कुरण.. आमच्या आधीच्या बच ला इथेच हत्तीचा कळप दिसला होता म्हणे. आम्ही पोचल्या पोचल्या मस्त बाहेर उन्हात बसून जेवण केलं. आणि उरलेल्या वेळेसाठी फॉरेस्ट गाईड सोबत एक ट्रेक प्लॅन केला. साधारण 5-6 किलोमीटर चा अगदी जंगलातला ट्रेक. सुरुवात तर इतकी चढि होती की एक क्षण वाटून गेलं.. चूक केली आणि आलो इकडं.. रुमवर झोपलो असतो तर परवडल असतं. पण चढाई संपल्यावरच जंगल वाट मात्र भारी होती.. वाटेने हत्ती काही दिसले नाहीत पण शेकरू आणि माकडं तेवढी दिसली. परत कॅम्प साईट ला पोचलो तर अगदी दारात बायसन बुवा हजर होते.. अगदी आवर्जून आम्हाला भेटायला आल्यासारखे. तोवर संध्याकाळ चे 5-6 वाजले हिते चहा नाष्टा करून तासभर ताणून दिली. 7-7.30 उठलो ते थेट जेवणासाठी. जेवण छान होत.. आणि कदाचित आमचं एकत्र ग्रुप सोबत हे शेवटचं जेवण होत.. कारण उद्या 3 जण जीप ने पुढे जाणार आहेत.. आणि कदाचित आम्ही पोहचण्याआधीच कॅम्प सोडणार आहेत. तयामुळे जे खाल्लं ते निवांत आणि चवीत खाल्लं.. एकमेकांचं नंबर देण्या घेण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. म्हणजे या पूर्ण सफरीचा उत्तरार्ध जवळ आला आहे.. आणि तो फारच रुखरुख लावणारा आहे. .
- फिरस्ती
27.12.2021
आनंद ..
ReplyDeleteतुझ्या नावातच आनंद आहे ..तुझी भ्रमंती वाचताना खुप आनंद घेता येतो .आणि ज्या जागेच वर्णन करतोस तिकडे जाउन आल्यासारखे वाटते ..खुप छान शब्दात वर्णन करतोस..मित्रा .. कधीतरी तुझ्या सोबत फीरायला ही आवडेल 😊 पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा.🤝