Munnar Diary (Day-5 last day)
पम्बाती शोला नॅशनल पार्क ते देवीकुलम बेसकॅम्प (50km)
आजची कॅम्पसाईटच इतकी अफलातून होती की इथून निघायचीच इच्छा होत नव्हती. पण कुठंतरी पोहचायचं तर कुठूनतरी निघायलाच हवं न !
आजचा सुरुवातीचा पॅच हा पूर्णपणे चढ आणि जंगल रस्ता होता. त्यामुळे कॅम्प लिडर च्या मते सकाळी लवकर निघणं अवघड होतं, कारण पूर्ण रस्त्याला प्रचंड धुकं आणि थंडी असण्याची शक्यता होती. त्यामुळे साधारण ८.३० ला नाश्ता हाणला आणि 9 ला चढाई सुरू केली. काल जो अफलातून, गझब जंगली उतार मिळाला होता तो आज तितकाच गझब चढ झाला होता. पण आमचा दिवसातला पहिलाच टप्पा होता त्यामुळे उत्साह एकदम झक्कास होता. त्याच उत्साहात आम्ही पूर्ण जंगल वाला पॅच एकही ब्रेक न घेता पार केला.. तस पाहता प्रत्येक चढ्या वळणावर पाय खूप कुरकुर करायचे. मग नागमोडी सायकल चालवत त्या किरकीऱ्या पायांना किंचित उताराचा अनुभव द्यायचो आणि हळू हळू पुश करायचो. शेवटी जेव्हा जंगली रस्ता संपला तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.. पहिलवानासारखी पायांवर थाप मारली आणि त्यांना thank you म्हटलं. तिथं पोचून एक पाण्याचा घोट घेतला.. थोडा वेळ मागं राहिलेल्यांची वाट पाहिली आणि पुढे निघालो.
पण पुढचा रस्ता जणू मुन्नार कडून आम्हाला मिळालेलं गोड गिफ्ट होतं. कारण, पुढे जवळ जवळ 10 किलोमीटर पूर्ण पूर्ण आणि संपूर्ण उतार होता.. मज्जा आली. सुरुवातीला 1-1 वर असणारे गियर्स कधी 3-7 ला गेले कळलं सुद्धा नाही. खरंतर, 3-7 च्या पुढे ही जर गियर्स असते तर ते ही वापरले गेले असते. गझब उतार होता एकदम. आमचं नशीब चांगलं होत की त्या उतरला जेवढी अपेक्षित होती तेवढी काही ट्राफिक मिळाली नाही.. पण जर मिळाली असती तर मात्र उतारसुद्धा जीवावर आला असता. कारण, उतारावर पूर्ण ब्रेक आवळले तरी सायकल शेळीच्या कोकरासारखी उधळत होती आणि त्यात जर पुढच्या गाडीने अर्जेंट ब्रेक मारला तर या सायकल रुपी कोकराला आवरताना नाकी नऊ येत होते. पण, हुश्श सारा उतार जबरदस्त वेगात आणि निर्विघ्नपणे पार पडला. त्यानंतरचा रस्ता एकदम निवांत होता.. थोडा चढ, थोडा उतार, थोडी वळण.. म्हणजे गेल्या चार दिवसात जे सायकलिंग केलं त्याचा ल.सा.वि.
मुन्नार येईपर्यंतचा प्रवास काहीतरीच चांगल्या वेगात आणि वेळात आम्ही संपवला. येताना वाटेत वेळोवेळी चिक्की, नारळपाणी विथ गोड मलई आणि लहर आली की चहा घेत निवांत सायकली चालवल्या. मुन्नार नन्तर देवीकुलम अंतर होत फक्त सात किलोमीटर. पण येताना हे अंतर आम्ही 10 मिनिटात कापलं होतं.. म्हणजे जाताना ते अंतर आमची परीक्षा पाहणार होत हे नक्की. आणि झालं देखील असंच.
एकतर भरपूर टंगळमंगळ केल्याने सूर्यदेव डोक्यावर आले होते.. आणि त्यात तो सात किलोमीटर चा चढ.. गझब होता. अगदी सरळ वर चढ नसला तरी लगातार सात किलोमीटर हलका हलका चढ होता. आमच्यातल्या एकला या पॅच ने प्रचंड त्रास दिला.. इतका की तो फक्त चक्कर येऊन पडायचा राहिला होता. मी आणि जय ने 1-2 गियर्स वर लगातार पेडलिंग चालू ठेवलं होतं.. तरीही जिथं त्रास वाटला तिथे एक दोन ठिकाणी थांबत थांबत आम्ही देवीकुलम गाठलं. आणि या सायकल ट्रेकचा शेवटचा टप्पा पार केला. आलेल्या सायकल बाजूला ठेवुन आम्ही थेट गारमगार गारेगार पाण्याने स्नानाम केलं. आणि अगदी उन्हात बसून सकाळी पॅक केलेलं जेवण संपवलं. हुश्श..
दुपारच्या जेवणानंतर पाच सहा टाळकी सहज मुन्नार भटकायला गेलो होतो.. म्हणजे शब्दशः भटकायला.. काही काम वगैरे नव्हतं.. काही विशेष शॉपिंग चा बेत नव्हता.. पण बरेच रस्ते, गल्ल्या, दुकानं पालथी घातली. नवनवीन पदार्थ टेस्ट केले.. आमच्यातला एकाला सत्तु पराठा खायचा होता तो ही शोधला आणि टेस्ट केला.. सरते शेवटी संबंध रिक्षावाले आणि बस वाले ज्या टपरीवर चहा घेतात.. अशी टपरी शोधून चहा मारला आहे.. गझब.. गेले बरीच वर्षे चहा पूर्णपणे बंद केलेल्या मी चहा कधी आणि कसा सुरू केला ते माझं मलाच कळलं नाहीये.. गेल्यावर्षी उटी मध्ये ही चहाचे मळे पाहिले होते.. सायकलिंग केलं होतं.. पण चहा काही घेतला नव्हता.. पण इथं घेतला.. याचं पूर्ण श्रेय मला वाटतं चहापेक्षा जास्त मुन्नार ला आहे..
आता जेवणाआधी YHAI कडून छोटेखानी प्रशस्तीपत्रक वाटपा कार्यक्रम झाला. म्हणजे मुन्नार सायकलिंग प्रेम प्रकरण तस संपलं आहे.. पण मुन्नारला विसरणं आणि पुन्हा न येणं केवळ अशक्य आहे.. Thank you Munnar, Thank You YHAI & Thank you तुम्हाला ही या प्रवासात सोबत करण्यासाठी..
भेटूया.. लवकरच.. एका.. नव्या प्रवासासोबत..
- फिरस्ती
Subscribe Firasti YouTube channel for upcoming audio visual Kerala & Munnar blogs i.e. VLOGS 😊
https://youtube.com/c/Firasti
Comments
Post a Comment