Munnar Diary (Day-1)
Yesssss, बऱ्याच दिवसांनी/महिन्यांनी पुन्हा एकदा हवा तस्सा (अगदी हवा तस्सा) सायकलिंगचा योग जुळून आला आहे. या वेळेस दौरा आहे केरळ मधील "मुन्नार" चा.. आणि सोबत आहे Yesssss... युथ हॉस्टेल ची..!!
तसं पाहता गेले ५-६ दिवस मी केरळ मध्येच आहे आणि वृषालीसोबत केरळात बरीच फिरस्ती करून झाली आहे.. उदाहरणार्थ मुन्नार, कोची, अलपेयी, तिरुअनंतपुरम वगैरे वगैरे..पण इथून पुढचा दौरा म्हणजे solo फिरस्ती आहे. आज पहाटे पहाटे तिरुअनंतपुरम मध्ये पदमनाभ मंदिर पाहिलं (टिपिकल साऊथ इंडियन वेशात). मंदिरम दर्शनम नंतर आम्ही दोघांनी तिरुअनंतपुरम सोडलं तिने मुंबईसाठी आणि मी पुन्हा मुन्नारसाठी. आता पुढचा प्रवास आहे सायकल सोबत आणि युथ हॉस्टेल सोबत मुन्नार भ्रमंती चा..!!
दुपारी वृषालीला बाय करून साधारण 2 वाजता अलुवा स्टेशनला उतरलो. अलुवा ते मुन्नार साधारण 4/5 तासांचा प्रवास आहे, म्हणजे उशिरात उशीर 8 वाजेपर्यंत YHAI गाठता येईल असा अंदाज होता. बस नक्की कुठे थांबते, कितीला येईल, किती वेळ घेईल वगैरे वगैरे भरपूर चौकशी करून मी योग्य जागी शांत उभा राहिलो. आजूबाजूच्या पॅसेंजर्स ना आधी8च सांगितलं होतं की मुन्नार जाणारी बस दिसली की सांगा..(कारण, बस वर फक्त, फक्त आणि फक्त मल्याळम मध्ये नावं लिहली होती). पण एक तास झाला पण बस काही येईना.. हळू हळू सोबतचे सारे पेसेंजर्स निघून गेले.. पण मुन्नार बस काही दिसेना.. मग परत चौकशी केली.. तर उत्तर मिळालं पुढच्या अर्धा तासात येईल बस.. मग काय, परत वाट पाहणं.. परत त्या अनाकलनीय भाषेत लिहलेल्या बसेस च्या पाट्या पाहणं आणि आजूबाजूला असलेल्यांना विचारानं.. त्यात पाठीवर असलेली खचाखच भरलेली बॅग खरच जीव काढत होती. बरं, ती खाली ठेवावी तर बसेस इतक्या भरून येत होत्या आणि पटकन निघून जात होत्या की बॅग उचलून झपकन शिरन जमलं नसतं.
चौकशी खिडकीने सांगितलेल्या अर्धा तासाचा पार तास होऊन गेला.. पण बसचा काही पत्ता नव्हता. आता आता तर आजूबाजूचे चणे-फुटाणे वाले, टपरी वाले माझी कीव करू लागले होते.. त्यातल्या एकाने मला "बस आली की सांगतो, तू जरा खाली बस" अस ही सांगितलं. पण मग गिर्हाईक आलं की त्याच लक्ष तिकडे जात होतं आणि तोवर सहज 2-3 बसेस निघून जात होत्या. म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं हा काही योग्य पर्याय नव्हता. मग मीच थोडं आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं. गुगल बाबाला मुन्नार हा शब्द मल्याळम मध्ये कसा लिहितात ते विचारलं आणि त्या शब्दाची डिझाईन प्रत्येक बस च्या पाटीशी मॅच करू लागलो. पण पूर्ण डिझाईन पाहुस्तोवर बस निघून जात होती. मग फक्त पहिल्या अक्षराची डिझाईन मॅच करू लागलो.. विचार केला की ते पाहिलं अक्षर मॅच झालं की पुढे कंडक्टर कडे चौकशी करायची. पण आज नशीब माझ्यावर इतकं रुसलं होत की ते पाहिलं अक्षर सुद्धा मॅच होईना.. डोकं खरच खराब झालं होतं. काही दिवसांपूर्वी वृषाली सोबत आलो होतो तेव्हा पाच मिनिटांत बस मिळाली होती.. आणि आज ही अवस्था.. मला तर काही सुचतच नव्हतं.. हा खेळ कधी संपणार काही काही कळत नव्हतं.. त्यात संध्याकाळचे 5 वाजले.. मग एका भल्या कंडक्टरने मला सांगितलं.. "डायरेक्ट बस चा नाद सोडून दे आणि बस बदलत बदलत जा.." पुढे त्यानेच मला एका बस मध्ये बसवून दिलं.. आणि त्या बसच्या कंडक्टरला सांगितलं या गरिबाला "कोथमंगलम" ला उतरावा..
आता बस तर मिळाली (कुठली का असेना) पण ती बस कमी आणि विरार लोकल जास्त होती. भयानक तुफान गर्दी होती.. इतकी की नीट उभा राहायला सुद्धा जागा नव्हती.. आत शिरून मी कसाबसा कंडक्टर च्या बाजूला उभा राहिलो.. (म्हटलं याच्या आजूबाजूला उभा राहिलो तर याच्या लक्षात राहील). पुढे पुढे गर्दी अशी वाढत गेली की.. एकाच पायावर तेही तिरक उभं राहावं लागलं. (त्या KSRTC बसने मला बसमध्येच फिरस्ती पोज द्यायला लावली). माझी ही अवस्था बघून माझ्यासारखच, एका पायावर उभ्या असलेल्या भल्या काकांनी माझी चौकशी केली आणि बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की "आज ख्रिसमस आहे, म्हणून बऱ्याच बस ड्रायव्हर्सनी रजा टाकल्या आहेत.. आणि त्यामुळे बसेस ची संख्या कमी आहे.. तू टेन्शन नको घेऊ मी तुला पुढच्या बसमध्ये बसवून देईल.." असे धीराचे शब्द ऐकल्यावर जरा बर वाटलं.. पुढे तासभर वृक्षासन केल्यावर कोथमंगलम ला आम्ही उतरलो. ठरल्याप्रमाणे त्या भल्या काकांनी उतरून मला पुढच्या बसमध्ये बसवलं. ती बस होती "अडीमली" गावाची.. म्हणजे डायरेक्ट "मुन्नार" नाही.. आणि अजून एकदा बस बदलणं आलं.. काय रे देवा..
कोथमंगलम पर्यंत ते भले काका तरी सोबत होते.. पण पुढे जेव्हा अडीमली ला उतरलो तेव्हा सोबत होती फक्त कडाक्याची थंडी. उतरून जॅकेट काढलं आणि हुडहूडत उभा राहिलो पुढच्या बसची वाट बघत. ती आली 10 वाजता.. आणि अखेर मी मुन्नार गाठलं 10.30 वाजता. पण मुन्नार आलं तरी sufferनामा काही संपला नव्हता. कारण, मुन्नार ला पोहचलो तेव्हा तिथून देवीकुलम बेसकॅम्पला बसने जाण्याचा पर्याय संपला होता. मग पुढचा बराच वेळ रिक्षा वाल्यांची मनधरणी करण्यात गेला.. ख्रिसमस च्या दिवशी आलेला हा दाढीवला पोरगा म्हणजे सांताक्लॉज आहे.. आणि आपल्याला जेवढं भाडं हवं तेवढं हा देईल याच थाटात ते भाडं सांगत होते.. सात किलोमीटर साठी 500 रुपये, 400 रुपये.. शेवटी बरच फिरल्यावर एकाने 200 रुपयात मला देवीकुलम सोडलं. तिथे पोहचलो तर कॅम्पसाईट एकदम थंडगार होऊन झोपली होती.. एक मुलगा तेवढा पुढे बसून जेवण संपवत होता.. खरतर गेल्या गेल्या त्याला जरा कॅम्प बद्दल, रजिस्ट्रेशन बद्दल विचारायला हवं होतं पण मी बोललो, "I'm hungry, can I get something to eat?" त्याने मला किचन दाखवलं आणि म्हणाला जे हवं ते घेऊन खा, प्लेट धुवून ठेव आणि झोप.. सकाळी भेटू..
मग मी शांतपणे, प्लेटचा आवाज न करता पण हवऱ्यासारखा डाळ भात हाणला.. आणि आता दोन चादरी ओढून पडलो आहे.. आजूबाजूला 10-12 जण लवंडलेले आहेत.. सगळे झोपले आहेत.. शांत.. पण मला पक्क ठाऊक आहे की हे सगळे अतरंगी आत्मे आहेत.. आणि पुढचे सात दिवस नुसती धमाल करणार आहेत.. मला ही त्यांच्यात मिसळून तेवढीच धमाल करायची आहे.. त्यासाठी आता अराम करायला हवा.. भेटू उद्या.. गुड नाईट
- फिरस्ती
25.12.2021
Superb but when the next post will come I m so excited...
ReplyDeleteयातुन शिकवण एकच.... माणसाने बहुभाषिक असावं..😊सुंदर शब्दांकन आनंदा👌👌
ReplyDeleteVery fantabulous, To fall in love with adventures and exploration of vast beautiful places of nature is the first secret of happiness.
ReplyDelete