जॉर्ज तिरुपती..!!
तर.. यावेळी ही अगदी निवांत.. आनंदात तिरुमला गाठलं. पहाटे साधारण 3 वाजता आम्ही तिरुमला मध्ये पोचलो. तिथं थोड थांबून, फ्रेश होऊन तिरुपतीला जायला निघालो.. खर सांगू, तिरुपतीच्या व्यवस्थापनच मला खरच अप्रूप आहे.. म्हणजे इतक्या लोकांचं राहणं, रांगेची व्यवस्था, स्वच्छता,रांगेत पाणी, खान, इत्यादी ची काळजी घेणं.. (आणि मुख्य म्हणजे लाडू) कमाल आहे. आणि हो तिरुमला हून तिरुपती ला जाताना होणारी तपासणी (Checking) हा अजून एक व्यवस्थापनाचा चांगला भाग. तपासणीत सुरक्षा हा एक भाग पण प्लास्टिक बॉटलस वगैरे वर न नेऊ देणं.. हे फारच उत्तम. त्यामुळे चढाई करण्याआधी चेकिंग ला थोडा वेळ वाट पाहावी लागली तरी काही वाटत नाही. यावेळीही तसंच झालं.. गाडी एका रांगेत लावली.. हळू हळू पुढे जात होतो.. जाणवलं की मागील दोन वेळेपेक्षा यावेळी गर्दी थोडी जास्त होती.. पण शिस्त होती.. त्यामुळे काही वाटलं नाही..
अखेर तपासणी टोल वर गाडी थांबवली, नियमाप्रमाणे प्लास्टिक बॉटल बाजूला केल्या होत्या, गाडीतलं समान आणि इतर माणसं बाहेर पडून आपापल्या तपासणी साठी गेली होते.. गाडीत फक्त मी होतो. तपासणीसाला संपूर्ण गाडी.. म्हणजे बोनेट, बूट स्पेस, सीट वगैरे सारं व्यवस्थित दाखवलं. शेवटी मग गाडीची डिकी बंद करून गाडीत बसलो आणि पुढे जाऊ लागलो. तितक्यात.. त्या सिक्युरिटी ने पुन्हा गाडी अडवली.. आणि त्याने अजून एकाला बोलावलं.. काही क्षण ते दोघे तेलगू मधे काहीतरी बोलले. अर्थ कळत नसला तरी काहीतरी मोठी गडबड आहे असं वाटत होती. मला नेमकं काय चाललं आहे तेच कळेना. .. पुढे आमची माणसं चेकिंग संपवून गाडीची वाट पाहत होती.. तितक्यात सिक्युरिटी ने मला खाली उतरायला सांगितलं. दोघं मला गाडी च्या मागे घेऊन गेली आणि डिकी कडे बोट दाखवलं. मी तिकडं पाहिल पण मला काहीच कळलं नाही. मग त्यांनी माझ्या हातात एक छोटा चाकू दिला आणि सांगितलं.."इस्को निकालो", तरी मला काही कळलं नाही. मगं त्याने सांगितलं की गाडीच्या मागच्या काचेवर जे "George Auto" लिहिल आहे ते काढ म्हणून.
खरतर मागे ठाण्यात कुठेतरी गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली होती त्यांनी त्याचं स्टिकर तिथे लावलं होत. पण त्या स्टिकरने असं काही होईल याची मला सुतराम कल्पना नव्हती. त्याला मी शांतपणे सांगितलं हे सर्व्हिस सेंटर वाल्यांनी लावलं आहे मी नाही. आणि या स्टिकरने नेमका काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तपासणी करून कृपया गाडी जाऊ द्या. पण तरी तो ऐकेना.. मग त्याने गाडीची नंबर प्लेट पाहून.. महाराष्ट्र.. कुठून आलात वगैरे चौकशी केली. त्या दोघांना ही मी हिंदू आहे गाडीतली माणसं देखील हिंदू आहेत हे सांगितलं.. तरी त्याचा मात्र एकच ठेका होता.. हे स्टिकर काढ. त्याला मी विनंती केली की चाकूने हे स्टिकर काढायचा प्रयत्न केला तर काच खराब होईल यावर स्क्र्याचेस येतील. तरी तो ऐकायला तयार नाही. दुसऱ्या सिक्युरिटी ने मला सांगितलं पूर्ण "George Auto" नाही तर कमीत कमी George तरी खोड. मला क्षणभर काही कळतच नव्हतं, मागे गाड्यांची रांग लागली होती पुढे बाकी माणसं वाट पाहत होती.. मग वैतागून मी मग कसबस नखाने ते George खोडण्याचा प्रयत्न केला.. मला खरतर हे जे काही चाललं होत त्यावर हसावं की रडाव तेच कळत नव्हतं. म्हणजे वरवर तर मला हसूच येत होत. कारण या नावाने असा काय धोका होता.. किंवा एखादा ख्रिश्चन बांधव जर समजा तिरुपती ला तर त्याने काय होणार होत. देव तर एकच आहे न.. पुढे कसाबसा तिथून निघालो आणि माणसांना बसवून तिरुपती चा घाट चढायला सुरुवात केली..
..आणि....
गाडीतल्या म्युजिक सिस्टम मधून आवाज आला.. "आतां वि श्वा त्म के दे वे... " आणि एक क्षण सुन्न व्हायला झालं.. ऊर खोल भरून आला आणि डोळ्यात अलगद पाणी आलं.. "ज्ञानोबा". संपूर्ण जग हे आपल कुटुंब आहे, "अवघे विश्वाची माझे घर" अस सांगणारे ज्ञानोबा.. वयाच्या सोळाव्या वर्षी जगाला पसायदान देणारे ज्ञानोबा.. पसायदान सुरू असताना डोळ्यातून येणार पाणी थांबत नव्हतं.. झालेला प्रसंग, गाडी वर फक्त George हा शब्द आहे म्हणून झालेली अडवणूक, त्याचा धर्माशी जोडलेला संबंध, देव, तिरुपती, हिंदू ख्रिश्चन.. एक ना अनेक डोक्यातले भुंगे क्षणात शांत झाले.
तिरुपतीच्या घाटात हळू हळू गाडी गिरक्या घेत वर चढत होती, तिरुपती जवळ येत होतं आणि डोळ्यात गच्च पाणी होत आणि मनात होते ज्ञानोबा..
"..जे खळांचि व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र
जीवांचे.."
Comments
Post a Comment