Ooty Diary (Day-6)



कालपर्यंत रोजच वेळापत्रक होतं ७-८-९. म्हणजे ७ वाजता चहा, ८ वाजता नाश्ता आणि ९ ला कॅम्प साईट सोडणं. पण आज एका शाळेत मुक्काम होता त्यामुळे आजच वेळापत्रक ६-७-८ होतं. आज बरोबर ८ वाजता पेडलिंग सुरु केलं. गम्मत म्हणजे आज पहिल्यांदा सगळी टीम एकत्र निघाली. आणि पहिला ग्रुप फोटो आज काढला गेला. आज सुरुवातीला दोन तीन चांगलेच टर्न होते.. ३-४ किलोमीटर चढ होता पण त्यानंतर एक सुंदर असा "एमराल्ड लेक" व्हीवू पॉईंट होता. चढ चढुन गेल्यावर असे पॉईंट्स खरंच सायकलिंगचा सारा शिण घालवतात. तिथं जरा "क्लिक क्लिक" करून मी थेट पुढे पेडलिंग सुरु केलं..

पण, फोटो हि अशी गोष्ट आहे की त्याची 'तहान' प्रत्येकाची 'वेगवेगळी' असते. एखाद्याचं पोट एक फोटो काढून भरत तर एखादा १०० फोटो काढूनही रडत असतो. त्यामुळे जरी सगळे एका पॉईंटला एकत्र आलो होतो तरी निघताना मात्र प्रत्येक जण वेगवेगळा निघाला. पुढचा रस्ता खरतरं माहित नव्हता पण एव्हाना गावात रस्ता कसा विचारायचा, कुणाला विचारायचा हे कसब प्रत्येकाला यायला लागलं होतं. मी हि आज अतिशय निवांत पुढे जात होतो. कारण, व्हीवू पॉईंट नंतर लागलेला उतार हा इतका शांत, आनंददायी आणि आल्हाददायक होता की.. वाहह.. म्हणजे ना पेडलिंग करावं लागतं होतं ना ब्रेक अवळावे लागत होते.. फक्त अगदी हलकं होऊन, नजर स्थिर ठेवून सायकलिंग अनुभवाव लागत होतं. मजा आली. बऱ्याचदा आम्ही ३-४ जण आजूबाजूला किंवा मागे पुढे सायकलिंग करत होतो.. पण कुणी कुणाशीच एक शब्द हि बोलत नव्हता.. बोलत होता निसर्ग आणि सायकलच्या चैन चा आवाज.. बस्स..
एका गावातून पुढे जाताना छोट्याश्या बेकरीत थांबलो होतो. काय अप्रतिम पदार्थ होते बेट्याकडं.. अगदी झक्कास.. आणि किंमत तर अगदीच कमी. मजा आली. त्यानंतर मात्र पुरेसा चढ होता.. पण आजचा चढ कालच्या सारखा हेअर पिन वाला नव्हता. हा अगदी डिप्लोमेटिक चढ होता. म्हणजे असं वाटायचं की किंचित वर गेलो की उतार आहे पण उतार काही यायचा नाही. आणि रस्ता मात्र हळू हळू चढत असायचा. आणि बऱ्याचदा पुढे पाहिल्यावर वाटायचं रस्ता सरळ आहे.. फ्लॅट आहे.. पण त्या रस्त्यावरून मागे वळून पाहिलं की जाणवायचं हा तर साला चांगलाच चढ होता.. गम्मत नुस्ती. आज संपूर्ण ग्रुप भलताच पसरलेला होता. कुणी खूप पुढे होतं, कुणी मागे होतं, कुणी अधे मधे इकडं तिकडं भटकत होते, तर कुणी रस्त्यात अराम करत होतं. प्रत्येक जण आपली आपली राईड अनुभवत होता. मी हि एकदा मेन रोड वरून बाजूला थोडं off route राईड केली. पण मग लगेच पुन्हा मुख्य मार्गाला लागलो.

त्यानंतर मात्र थेट "फर्ण हिल" गाठलं. फर्ण-हिल म्हणजे आजची मुक्कामाची जागा. पण आजही आमचा मुक्काम एका शाळेत होता. त्यामुळे संध्याकाळी पाच पर्यंत शाळेत जाणं शक्य नव्हतं मग जरा इकडं तिकडं फिरलो. एका गार्डन गेलो आणि मस्त एक तास झोपलो. अर्धा तास उन्हामध्ये आणि अर्धा तास सावली मध्ये. कारण, सावलीत झोपलो कि भर दुपारी देखील प्रचंड थंडी वाजायची आणि उन्हात झोपलं कि बरं वाटायचं पण चेहऱ्यावर चटके बसायचे. तर साधारण पाच पर्यंत झोपायचा उपक्रम केला आणि मग कॅम्प साईट गाठली. आज आम्ही जवळपास उटी मध्येच आहोत. आणि त्यातल्या त्यात एका उंचीवर आहोत. त्यामुळे प्रचंड थंडी आहे इथे. इतकी कि बाहेर गेल कि दात वाजायला लागतात.

आज जेवण वगैरे झाल्यावर मस्त गप्पा रंगल्या होत्या.. आणि गप्पांचे विषय तर एकसो-एक होते. "फिरणं, लग्न, दारू वगैरे वगैरे.. दारू हा विषय म्हणजे "दारू म्हणजे नेमकं काय ? ती कशी बनवतात, तीचे प्रकार कोणते, गावठी आणि ब्रँडेड दारू यातला फरक नेमका काय, दारूचं अर्थकारण, दारू बनवण्याची खरी कॉस्ट किती आणि मार्केटिंग कॉस्ट किती.. वगैरे वगैरे''. प्रत्येक जण आपापले अनुभव, किस्से सांगत होता. आणि मी फक्त ऐकत होतो.. मला या गप्पा कधीच संपू नयेत असं वाटत होतं.. मनात आलं या गप्पांना, या ट्रिपला स्टेचु करता आलं तर किती बरं होईल न ?
असो, आता गप्पा संपल्या आहेत.. आणि "गाणी" चालू झाली आहेत..
पण ही गाणी पण शब्द नसलेली "गाणी" आहेत...
फक्त सूर..
फक्त.. घो र णं...
घरर्रर्रर्रर्रर्रर्रर्र.. घरर्रर्रर्रर्रर्र...!!
- फिरस्ती
13.03.20








Click on the link below to read previous Ooty Diaries :

Ooty Diary (Day - 0)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-0.html?m=1

Ooty Diary (Day - 1)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-1.html?m=1

Ooty Diary (Day - 2)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-2.html?m=1

Ooty Diary (Day - 3)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-3.html?m=1

Ooty Diary (Day - 4)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-4.html?m=1

Ooty Diary (Day - 5)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-5.html?m=1

Keep.Reading.KeepTraveling

Comments

Post a Comment

Popular Posts