Ooty Diary (Day-1)
काल झोपताना एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली होती.. "काही झालं तरी ९ ते १० वाजेपर्यंत आजिबात उठायचं नाही.. मस्त ताणून द्यायची आणि लोळत पडायचं". पण, आज सकाळी मात्र ७ वाजताच डोळे उघडले. आधी वाटलं सवयीने जाग आली असावी. पण परत झोपण्याचा प्रयत्न केला तर झोप येईना. मग जाणवलं माझ्या बाजूचं व्यक्तिमत्व अगदी दर्दभऱ्या आवाजात घोरत आहे.. आणि त्याच्या त्या आवाजाने मला काही झोप येत नाहीये. मग काय झोपायचा नाद सोडून दिला आणि उठून फ्रेश झालो. फ्रेश होण्यासाठी बाहेर जाताना मला जाणवलं की माझ्या बाजूलाच नाही तर पूर्ण डब्यात घोरण्याचा सामुदायिक ऑर्केस्ट्रा चालू आहे. जवळजवळ ५-६ जण वेगवेगळ्या सिटवरून आपले आपले सूर आळवत होते. आणि सगळा डबा त्या आवाजाने घुमत होता. आधी वैताग वाटला पण मग गम्मत वाटली. कारण, एक सूर बाजूने यायचा, तो शांत होईस्तोवर दुरून अजून दुसरा सूर यायचा मग तिसरा मग चौथा. आणि काही क्षणातच "मिले सूर मेरा तुम्हारा" करत एक अप्रतिम "राग" तयार व्हायचा.
गम्मत नुसती..
गम्मत नुसती..
फ्रेश झाल्यावर मात्र पाहिलं प्रथम पोटाचा विचार केला. बऱ्यापैकी भूक लागली होती. मस्त इडली वडा घेतला, त्यावर नारळाची चटणी टाकली सोबत आईने दिलेला खाकरा ठेवला आणि एक घास तोंडात टाकला. आणि मनात म्हटलं "वाहह" नारळाची चटणी लाजवाब होती. पण दुसरा घास घेताना प्लेट हलली आणि सगळी चटणी पॅन्टवर नको त्या जागी सांडली. पण म्हटलं जाऊदे. सांडलेली चटणी तशीच ठेवून मी उरलेली इडली आणि खाकरा हाणला. त्यानंतर मग दरवाजाजवळ उभा राहून हवेने आणि खिडकीतून आलेल्या उन्हाने पॅन्ट मी व्यवस्थित सुकवली. खाऊन वगैरे झाल्यावर मग जरा आजूबाजूला बघायला सुरुवात केली. तोवर ते (बाजूचं) घोरणार व्यक्तिमत्व सुद्धा जागं झालं होतं. साधारण विनोद कांबळी सारखा चेहरा आणि कादर खान सारखी शरीरयष्टी असलेलं पात्र भलतंच गमतीदार होतं. मग अशाच गप्पा निघाल्या. ते काका रेल्वे मध्ये कामाला होते. आणि कामानिमित्त मुंबईला आले होते. पण त्यांच्या मते, "मुंब्बई इझ वेरी डर्टी.. पीपल इट ऍण्ड थ्रो पॅकेट्ट ऑन द रोड.. वेरी बॅड.. कॉइम्बतोर, बँगलोर इझ गुडड.." आता यावर मी काय बोलणार..? कारण मी स्वतः अश्या कित्येकांना बघितलं आहे.. काहीतरी खाऊन कचरा इकडं तिकडं टाकताना. त्यानंतर मी जरा विषय वळवला.. मग रेल्वे, रेल्वे चं कँटीन वगैरे गप्पा झाल्या.
दुपार मात्र एकांडी होती. आजूबाजूला अगम्य भाषेत कल-कल चालू असताना मी मस्त पाय पसरून पुस्तक वाचत होतो. निवांत. मग थोडासा अराम केला. संध्याकाळी "बनाना भज्जी" नावाचा प्रकार खाल्ला. आपल्या बटाटा भजी सारखाच होता पण त्यात कच्ची केळी होती. बटाटा भजी मध्ये केळा वेफर्स टाकून खाल्ल्या सारखं वाटलं. पण पॉट भरलं.
धावत्या ट्रेन मध्ये वेळ कसा अगदी मंतरलेला वाटत होता. त्यात पुस्तक सुंदर होत. आणि पुस्तकातून डोकं बाजूला केलं की खिडकी होतीच. संध्याकाळी कर्नाटकातुन वगैरे गाडी जात असताना थोड्या पावसाच्या सरीही भेटून गेल्या.
एकंदर प्रवास सुंदर चालू होता. पण या सुंदर प्रवासाच शिखर म्हणजे एका शेजारील व्यक्तिमत्वाशी झालेल्या गप्पा. एक चाळीशी उलटले गृहस्थ बँगलोरला चालले होते. मी सायकलिंग ला चाललो आहे हे त्यांनी कुठून तरी ऐकलं होतं. मग त्यांनीच गप्पा सुरुवात केली. सुरवात कसली थेट माझ्या माझ्या "पोटावरच" बोट ठेवलं. "आप सायकलिस्ट हो.. तो belly doesn't suits u.. you have to be fit.." मग काय.. आधी आरोग्य.. त्यानंतर योगा.. मग रामायण.. त्यात राम-शबरीचा संवाद, मग महाभारत, गीता, मग प्रेम, कुटुंब असं कितीतरी विषयांवर बोलणं झालं. या बोलण्यात मी दहा टक्के बोलत होतो आणि ते नव्वद टक्के बोलत होते. पण प्रत्येक विषयावरच त्यांचं बोलणं इतकं संयत आणि अभ्यासपूर्ण होत की ऐकतच राहावं. माझी संध्याकाळ आणि संपूर्ण प्रवासला या भेटीने एक प्रसन्नता दिली.
आता जवळ रात्रीचे ११ वाजत आले आहेत.. ट्रेन तिच्या वेळापत्रकापेक्षा ४-५ तास लेट चालते आहे. त्यामुळे उद्या कितीला पोहचू काही कल्पना नाहीये. पण काही झालं, कितीही उशीर झाला तरी हरकत नाही. कारण, प्रत्येक क्षण इतका सुंदर आहे की मजा येतेय.. आणि कुठेतरी हा प्रवास संपूच नये असंही वाटतंय...
Click on the link below to read previous Diary:
#Keep reading #Keep traveling
इंडियात राहणारा आनंद सध्या भारत बघतोय. मस्त.
ReplyDelete:-) ☺️
Deleteसुंदर...
ReplyDeleteThanks buddy
Delete