Ooty Diary (Day-4)


 आजचादिवस हा काल रात्रीच्या अनुभवाशिवाय अपूर्ण आहे. कारण काल रात्री झालेला किस्सा अविस्मरणीय आहे. झालं असं की रात्री साधारण १२.३० वाजता एकाला काहीतरी चावल्यासारखं वाटलं. मोबाईल च्या उजेडात पाहिलं तर.."ढेकूण". मग अजून एक जण ओरडला "यहा भी खटमल है". मग रूम मध्ये नुसता कल्ला सुरु झाला. झोपलेले जागे झाले, जागे असलेले शोधते झाले आणि शोधणारे स्वयंघोषित CID झाले. तास-दोन तास नुस्ती जबरदस्त शोधमोहीम चालू होती. चादरिमधे, गादीवर, खिडकीजवळ, बेड च्या कोन्याकोन्यात ४-५ जणांच "ढेकूण पथक" रात्री १२.३० वाजता ढेकूण शोधत होत. त्यांची शोधमोहीम चालू असताना एक दोन जण कॅमेरा घेऊन सापडलेल्या ढेकणांचे फोटो काढत होते. आणि जरा भांडण्याची अंगभूत कला असलेली मंडळी ट्रेक-लीडर आणि हॉटेल मालकाला फोन करून अप्रतिम सतावीत होते. रात्री दोन वाजेपर्यंत ही शोधमोहीम cum संशयकल्लोळ cum हास्यकल्लोळ cum गदारोळ चालला होता.  शेवटी रात्री दोनला आम्हाला नवी रूम दिली आणि प्रत्येक जण शांत झोपी गेला. झोप लागली पण आमच्या डोक्यातून 'खटमल' काही गेला नाही.

सकाळी वेळेवर उठलो.. कालच्या अनुभवातून बरेच जण शहाणे झाले होते त्यामुळे आजिबात टाईमपास न करता प्रत्येक जण वेळेवर निघाला. आजची राईड होती "उटी ते मंजूर" साधारण ३५ किलोमीटर्सची. सुरुवातीला थोडं uphill होतं पण त्यानंतर जो काही उतार लागला होता तो अक्षरशहा कम्म्ममाल होता. कारण, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार चहाचे मळे (मळे कसले एकदम डोंगरच) होते. त्यात अधेमधे असणारी उंच उंच झाडं आणि मलाई मारके "मख्खन" रस्ता म्हणजे कम्म्ममाल. इतकं सुंदर का बरं असावं एखाद्या जागेने.. म्हणजे या निलगिरीला अनुभवल्यावर क्षणभर हिमालय विसरायला व्हावं इतका सुंदर आहे हा संपूर्ण परिसर.



त्यात असलेले रस्ते म्हणजे निव्वळ वाह..!! कारण, रस्त्याला इतकी वळण आहेत की यांच्यासमोर जिलेबी पण fail होईल. आणि तुम्हाला जर सायकल वर बसून असे वळणदार उतार अनुभवायला मिळाले तर आयुष्यात अजून काय हवं. खरं सांगायचं तर शब्दात नाही पकडता येणार तो उताराचा अनुभव. चहाच्या मळ्यांच्या बाजूने जाताना एखाद्या ठिकाणी चहाचा असा सुंदर घमघमाट यायचा कि क्षणभर बाजूला थांबून फक्त तो वास छातीत भरून घेत होतो.

पण सायकलिस्ट साठी उतार जीतके लोभस असतात तितकेच टेन्शन वाले पण असतात. कारण, उतारावर सायकलिस्टची खरी कसोटी लागते. वळणावळणाच्या उतारावरुन खाली उतरताना तुमची सायकालवरची पकड मजबूत असावी लागते. कारण, कधी सायकल वेग घेईल, कधी एखादा ट्रक समोरून येईल काही सांगता येत नाही. पण इतकं जर का तुम्ही व्यवस्थित केलंत तर ही दोन चाकं तुम्हाला जमिनीवर स्वर्ग दाखवतात.

 मंजूर ४ किलोमीटर असताना गरगर करत खाली उतरणारा रस्ता हळू हळू सरसर करत वर चढायला लागला. आणि मग मात्र प्रत्येकाला धडकी भरली. कारण उतार जसे वळणावळणाचे होते तसेच किंवा त्यापेक्षा जास्त कठीण चढ होते. तीन किलोमीटर रस्त्यात जवळजवळ १०-१५ Hairpin bends होते. आणि प्रत्येक वळणावर तर चक्क पाटी होती ३४ पैकी किती bends गेले आणि अजून किती बाकी आहेत. हे मात्र खूपच खतरुड होतं. काही सायकलिस्ट मंडळी सोडली तर बऱ्याच जणांनी हे उतार सायकल हातात घेऊन ओढत जाणं पसंद केलं. मीही बरेच ब्रेक्स घेतले पण सायकल चालवातच "मंजूर" गाठलं. कारण हातात सायकल घेऊन चालणं मला काही मंजूर नाही.

मंजूरला आल्यावर थेट बिछाना गाठलं आणि तास दोन तास नुसता आराम केला. झोपण्याचा प्रयत्न केला पण डोळे बंद केले की धडकी भरवणारे "हेयर पिन" bends दिसत होते. आता जेवण वगैरे दाबून झालंय. आता फक्त झोप हवी आहे.. डान्स नको, धिंगाणा नको, आणि ढेकूण सुद्धा नक्को..

- फिरस्ती
11.03.20








Click on the link below to read previous Ooty Diaries :

Ooty Diary (Day - 0)

Ooty Diary (Day - 1)

Ooty Diary (Day - 2)

Ooty Diary (Day - 3)

Comments

Popular Posts