Ooty Diary (Day-3)


"आनंद.. आनंद..!!" आज सकाळी सकाळी 6 ला कुणीतरी आवाज दिला. उठून पाहिलं तर त्र्यंबक सर morning walk साठी आवाज देत होते. पटकन उठून बाहेर पडलो. सोबतीला प्रचंड अशी थंडी होतीच..! सकाळी सहाला "उटी" बऱ्यापैकी झोपेतच होतं. कुठेतरी फक्त एखादं चहाचं दुकान वगैरे उघडलेलं होत.. बाकी किर्रर्रर्र शांतता, निळसर अंधार, डोंगरावर मिणमिणनारे दिवे आणि उडी मारली की अगदी हाताला लागेल इतक्या उंचीवर होता मोठ्ठासा चंद्र.. शब्दातीत होता नजारा..!! तासभर मस्त walk केला आणि परत हॉस्टेल गाठलं. काल रात्री अंघोळ केली होती म्हणजे आज सकाळी अंघोळ करण्याचा अजिबात प्रश्न नव्हता. आल्या आल्या थेट नाश्ता हाणला, दुपारचं जेवण पॅक केलं आणि दिवसाची सुरुवात झाली.

 Finally, आम्हाला आज सायकल भेटली. "हो भेटलीच". कारण, माझ्यासाठी तरी सायकल ही वास्तू नाही तर एक व्यक्तीचं आहे.. चालणारी, बोलणारी, downhill वर हसणारी आणि कधी कधी chain पाडून रुसणारी.. एक जिवंत गोड व्यक्ती..!! प्रत्येकाने मग चालवून, पारखून, तपासून आपआपली सखी निवडली. आणि मग सुरुवात झाली खऱ्या "जोडी परीक्षेला". तसं पाहता आजची राईड हि फक्त ट्रायल राईड होती. साधारण फक्त सात ते आठ किलोमीटरची.

पण गम्मत हि होती की यातले 5 किलोमीटर फक्त आणि फक्त चढच होता. फार उत्साहाने सुरुवात केली आम्ही.. उटी शहरातून बाहेर येईपर्यंत एकत्र मजा केली. पण मग हळू हळू रस्ता वर चढु लागला आणि वीस जणांचा एकत्र चालणारा कळप. कुठे दोन.. कुठे तीन, एक.. कुठे पाच असा विभागलेला दिसू लागला. प्रत्येक जण त्याला जमेल तसं स्वतःला push करत होता. थोडं अंतर गेल्यावर फोटो वगैरे काढून एकमेकांचा उत्साह वाढवत होता. पण तरीही 5 किलोमीटर ने तीन तास घेतलेच. आणि आम्ही पोहचलो "Tea Factory" मध्ये.  खरतरं मी अजिबात चहा पीत नाही. पण मला चहा बनवायला आवडतो. आणि या फॅक्ट्रीमध्ये तर चहाच्या ताज्या हिरव्या पानांपासून ते चहा पावडर पर्यंतची पूर्ण प्रोसेस पाहायला मिळाली. ती हिरवी हिरवी ताजी पानं जेव्हा एका मशीन मधून दुसरीकडे जात होती तेव्हा त्याचा रंग, आकार बदलत होता. मला एका ठिकाणी त्या पानांचा इतका अफलातून सुवास आला की बस्स.. मनात आलं की आता चहा घ्यावाचं..!! चहाचा इतका सुदंर आणि ताजा वास मी आजवर माझ्या आयुष्यात घेतलेलाच नव्हता. निव्वळ अप्रतिम..!!
Te Factory च्या बाजूलाच चॉकलेट फॅक्ट्री होती. ती ही पाहून घेतली. पण खरं सांगायच तर तिला Tea Factory ची मजा नाही. मग थोडी shopping वगैरे करून आम्ही आमच्या मार्गाला लागलो. वाटेत मस्त एका मस्जिद समोर बसून जेवण हाणलं. मजा आली. (किती पराठे खाल्ले तेवढं मात्र विचारू नका..!!) नंतर चा रस्ता बऱ्यापैकी उताराचा होता. पण जरा खतरुड पण होता. कारण, एकतर विचित्र उतार होते, त्यात नक्षीदार खड्डे होते आणि माती खडीची रांगोळी तर वेगळीच. त्यामुळे खूप सांभाळून उतरावं लागत होतं. पण मग पुढे जाऊन मस्त डांबरी रस्ता लागला आणि मज्जा आली.

 उतारावर सायकल भन्नाट वेग घेत होती त्यामुळे दोन्ही ब्रेक्स अवळावे लागत होते. पण जेव्हा समोर सरळ रस्ता दिसे तेव्हा मी हळूच ब्रेकवरचा हात सैल करत होते. आणि सायकल झुम्म्मम करून पुढे जात होती. तेव्हा येणारी मजा म्हणजे.. निव्वळ अफलातून. आतून नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण वळण दिसलं कि परत ब्रेक टाईट. संध्याकाळी बराच वेळ मोकळा होता मग मस्त उटी मध्ये फिरस्ती केली. त्यात मस्त रंगपंचमीही झाली. रंगात रंगल्यावर प्रत्येक जण कसा "एक" झाला होता. 'तू दिल्ली, मी बंगाल, मी महाराष्ट्र.. असं काही राज्य वगैरे उरलचं नव्हतं'. मज्जा आली.

रात्री जेवणानंतरही खूप धमाल केली. आता ११.३० ला रुम मध्ये येण्याआधी बाहेर नुसता कल्ला होता. गाणी डान्स, शायरी कविता आणि बरंच काही. ग्रुप मधली एक मुलगी फारच सुंदर नाचात होती. तिच्या प्रत्येक स्टेप ला आपसूक "वाहह" निघून जायचं. निव्वळ कमाल. खरंच नाचायला यायला हवं यार.. शिकायला हवं. आता प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये गेला आहे. कदाचित सगळे झोपेलेही असतील. मी हि झोपतो. कारण, मला डान्स ची प्रॅक्टिस करायची आहे.... स्व.प्ना.त..!!

 - फिरस्ती 10.03.20





Click on the link below to read previous Ooty Diaries :

Ooty Diary (Day - 0)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-0.html?m=1

Ooty Diary (Day - 1)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-1.html?m=1

Ooty Diary (Day - 2)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-2.html?m=1

Comments

Popular Posts