Ooty Diary (Day-2)
आज सकाळी जाग आली तेव्हा जाणवलं की एक हि "सूर" ऐकू येत नाहीये. आजूबाजूला पाहिलं तर पूर्ण डबा बऱ्यापैकी रिकामा झाला होता. एकाला विचारलं तर कळलं पहाटे बँगलोर स्टेशन येऊन गेलं. आणि बऱ्यापैकी गर्दी बँगलोरला खाली झाली होती. मग काय थोडा निवांतपणा.. थोडा एकटेपणा... आणि प्रवास..!
ट्रेन जवळ जवळ 6 तास उशिरा चालली होती. त्यामुळे कोईम्बतुरला सकाळी ७ ला पोचण्याऐवजी दुपारचे एक वाजणार होते. मग का कुणास ठेवून मी उगीचच जागा बदलली.. खिडकी बदलली.. आणि निवांत पणे पुस्तक वाचत बसलो. साधारण त्रिप्पूर गेलं तेव्हा हलकेच माझा डोळा लागला. आणि जाग आली तेव्हा गाडी थांबलेली होती. आणि गाडीत फक्त साफसफाई करणारी मंडळी होती. मी झोपेतच एकाला विचारलं "कोनसा स्टेशन" तो म्हणाला "कोईम्बतुर". माझी झोप अगदी खाडकन उतरली.. दोन मिनिटात बॅग अवरली आणि पटकन प्लॅटफॉर्म वर उतरलो. उतरल्या उतरल्या आधी सारं सामान तपासलं, सगळं व्यवस्थित होतं. मग सरळ हॉटेल गाठून पोटभर जेवलो आणि पुढच्या मार्गाला लागलो.
ट्रेनने उशीर केल्यामुळे मी कवीला (अरकू ट्रेक ला भेटलेली तामिळनाडू ची मैत्रीण) पुढे जायला सांगितलं होतं. पण स्टेशन बाहेर पडल्यावर मात्र काही वेळ काही कळेचना. मी आजूबाजूला विचारण्याचा प्रयत्न केला पण मग मी विचारलेल त्यांना काही कळेना. मग कसबस स्टेशनहुन सिटी बस (TMT सारखीच) पकडली आणि "गोवंडमपालयम" गाठलं. गोवंडमपालयम म्हणजे जिथून उटी साठी (तामिळनाडू) एसटी बसेस मिळतात ते ठिकाण. गोवंडमपालयमला उतरल्यावर समोर बऱ्याच बसेस लागल्या होत्या. पण प्रत्येक बस वर साधारण "अंडूगुंडुठंडापाणी" असच लिहिलं होतं. एकही बसवर इंग्लिश/हिंदी वगैरे काही नाही. मग इकडं तिकडं चौकशी केल्यावर योग्य बस मिळाली आणि एका खतरुड प्रवासाला सुरुवात झाली.
खतरुड या साठी कि... कोईम्बतुर बाहेर पडल्यावर उटी पोहचेपर्यंतचा रस्ता म्हणजे एक अफलातून adventure आहे. त्यात मी अगदी ड्रायवर च्या बाजूच्या सीट वर बसलो होतो मग काय डबल खतरुड. उटीला जाणारा रस्ता इतका अरुंद आणि वळणावळणाचा आहे न कि एका एका वळणावर वाटतं कि गाडी आता डोंगरावर तरी चढेल किंवा दरीत तरी जाईल. कारण, वळण घेताना समोर रस्ता असा काही दिसतच नाही. आणि अशात जर समोरून एखादी गाडी आली अजून खतरुड. पण जस-जसे आपण वर जाऊ तसा या खतरुड पानाची जागा अप्रतिम निसर्ग घेतो आणि मग आपण फक्त पाहतच राहतो. उंचच उंच हिरवेगार डोंगर, गगनभेदी झाडं, अधूनमधून दिसणारे चहाचे मळे आणि त्या मळ्यांमध्ये असलेले घरांचे मळे. अप्रतिम आहे सारं. असं वाटत मुंबई वगैरे सोडून अश्या जागी येऊन राहावं. निवांत.
कोईम्बतुरते उटी हा चारतासाचा भन्नाट प्रवास आहे. संध्याकाळी साधारण सहा वाजता मी युथ हॉस्टेल गाठलं. कवी भेटली. त्यासोबत नवे नवे बरेच मित्र भेटले. एकूण २० जणांचा ग्रुप आहे पण त्यातही ८-९ राज्य आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान. म्हणाल तर संपूर्ण भारत आहे आजूबाजूला. आता जेवनानंतर ओळखी झाल्या आहेत.. उद्यापासून हळूहळू मैत्री होईल. आता रुम मध्ये येण्याआधी आमच्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांच्या धम्माल गप्पा चालल्या होत्या. सायकलिंग, ट्रेक्स.. मग तोरणा, लिंगाणा, माहुली, नाणेघाट, सह्याद्री, हिमाचल, जलोरीपास, सारपास, अरकू.. कितीतरी विषय किती तरी अनुभव. गम्मत आहे. बाहेर थंडी टोचत होती तरी गप्पा काही थांबत नव्हत्या. अखेर मग उद्या लवकर उठायचं आहे म्हणून रुम मध्ये आलोय..
पण गप्पा मात्र चालूच आहेत..
- फिरस्ती
09.03.20
09.03.20
Clic on the link below to read previous Ooty Diaries :
Ooty Diary (Day 0)
Ooty Diary (Day 1)
#KeepReading #KeepTraveling
Comments
Post a Comment