Ooty Diary (Day-5)




सकाळी बराच वेळ लोळत पडलो होतो. अस्सच.. खरतरं "मंजूर" सोडून निघणं मनाला नामंजूर होतं. पण काय करणार कुठंतरी पोचण्यासाठी कुठुनतरी निघावं लागतं. मग काय उठून आपलं आपलं आवरलं आणि सरळ पेडलिंग सुरु केलं.. निघालो.. मंजूर हुन "एडकड्डू" कडे.. एडकड्डू हा आजचा आमचा lunch point होता. कालचा दम काढणारा तीन किलोमीटरचा चढ आजचा मजेदार उतार होता. काल ज्याने 2 तास घेतले तोच रस्ता आज 15 मिनिटात व्यवस्थित पार केला.

पण त्यानंतर मात्र परत सुरु झाले दम काढणारे "हेयरपिन टर्नस्". या रस्त्यावर एकूण ३४ हेयरपिन टर्नस् आहेत. त्यातले काल १२-१५ पार केले. आणि आज आमच्यासमोर उरलेले २० होते. खरं सांगायचं तर "धूर" निघत होता प्रत्येक चढ चढताना. सायकल १-१ गियर वर टाकून चालवत होतो पण तरीही धाप लागायची, पाय जड व्हायचे, आणि कुठंतरी सायकल बाजूला ठेवून जमिनीवर पडावसं वाटायचं. पण तरीही हळू हळू स्वतः ला पुश करत एक एक हेयर पिन पार करत होतो. दुपारी साधारण १२ वाजता एडकड्डू गाठलं. गावात पोहचलो तेव्हा अजून काही मंडळी यायची बाकी होती. एडकड्डू तसं डोंगरावर असलेलं छोटंसं गाव आहे. गावाजवळ एक डोंगर आहे आणि त्याच्या शिखरावर शंकराचं एक मंदीर आहे. मग म्हटलं बाकी मंडळी येऊस्तोवर शिखरावर जाऊन यावं आणि निघालो. मी, मेघना आणि निलेश तिघे जण गप्पा गाणी करीत करीत वर पोहचलो तर वरून दिसणारा नजर अप्रतिम होता. आणि गम्मत म्हणजे ते शिखर एक अफलातून "एको पॉईंट" होतं. एक आवाज दिल्यावर त्याचे आजूबाजूने पाच प्रतिध्वनी येत होते. मग काय "छत्रपती शिवाजी महाराज कि.... जययययय..!!"

खाली उतरलो तेव्हा सगळी मंडळी येऊन पुढे निघून गेली होती. मग आम्ही हि आमच्या मार्गाला लागलो. प्रत्येक पेडल जगणं आणि निसर्ग अनुभवणं हेच आमच ध्येय होतं त्यामुळे आम्ही निवांत आमच्या स्पीड ने सायकलिंग करीत होतो. आताशा चढ आणि उतार दोन्ही सारखेच वाटत होते. कारण दोन्ही हि सायकलिंग चा अविभाज्य भाग आहेत... आयुष्यात असणाऱ्या सुख-दुखासारखे.. एक आहे म्हणून दुसऱ्याला गम्मत आहे. आणि चढ आहे म्हणून उतरला किंमत आहे. कुठेतरी मध्ये थांबून मस्त पोटभर जेवण केलं. आणि लवकरच आजची कॅम्प साईट "एमराल्ड लेक village" गाठलं. पण आज आमचा मुक्काम ज्या शाळेत आहे त्या शाळेची काही सुट्टी झाली नव्हती. मग अजून पेडलिंग करत एमराल्ड धरण आणि त्याच जलाशय पाहून आलो. 


मला एमराल्ड हे आपल्या तानसा-मोडकसागर सारखच भासलं. तिथून एकदम रमत गमत शाळा गाठली. शाळेतल्या एका वर्गात आमची आजची राहण्याची व्यवस्था आहे. संध्याकाळी भज्जी आणि रात्रीचं जेवण कच्चून हाणलं. आणि मग सहज चालत जवळचा डोंगर गाठला. बऱ्यापैकी अंधार पडला होता. अजूबाजुचे काही दिवे सोडले तर किर्रर अंधार आणि थंड शांतता होती. सहज लक्ष आभाळात गेलं तर.. आभाळ चांदण्यांनी भरून गेलं होतं. आमच्यातला प्रत्येक जण अगदी हरखून गेला होता. आम्ही मग तिथेच रस्त्यावर खाली झोपलो आभाळाकडे तोंड करून. चांदणं न्याहाळत..
मला तर क्षणभर अगदी भरून आलं होतं.. किती किती सुंदर आहे हे सारं.. शब्दातीत..

मी मनातच आभाळाला म्हणालो.. "देवा तुझ्याकडे इतकं चांदणं आहे, तू चांदण्यांनी श्रीमंत आहेस.. थोडंसं चांदणं मला देतोस का.. मला इकडंच चहा, चॉकलेट काही काही नक्को.. बस्स थोडस चांदणं दे.. माझ आभाळ सजविण्यासाठी.."
आभाळ म्हणलं.. "चांदणं तर तुझ्या आभाळात देखील आहे.. माझ्याइतकंच.. फक्त तुझा 'मी' पणाचा झगमगाट थोडा कमी कर.. आणि बघ.. तुला तुझं चांदण्यांनी भरलेलं आभाळ नक्की गवसेल..

- फिरस्ती
12.03.20





Click on the link below to read previous Ooty Diaries :

Ooty Diary (Day - 0)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-0.html?m=1

Ooty Diary (Day - 1)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-1.html?m=1

Ooty Diary (Day - 2)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-2.html?m=1

Ooty Diary (Day - 3)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-3.html?m=1

Ooty Diary (Day - 4)
https://www.firasti.in/2020/03/ooty-diary-day-4.html?m=1

Comments

  1. लय भारी आनंद. शेवट खूप अर्थपूर्ण. Loved it.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts