Leh Diary (Day-4)
जुले..
काल काहीच्या काही अद्भुत राईड मारली होती.. त्यामुळे रात्री एकदम गाढ झोप लागली होती, गाढ आणि एकदम स्वप्न विरहित.. सकाळी उठलो तेव्हा कमाल फ्रेश वाटत होत. प्रथेप्रमाणे मस्त आंघोळीची गोळी घेतली आणि नाश्त्या वर तुटून पडलो. आज बर्याच दिवसांनी पोहे मिळाले..
कालच्या चढाने आमच्या दोन मित्रांची तब्यत खराब केली होती.. त्यामुळे त्यांनी सायकलिंग थांबवण्याचा निर्णय घेतला अणि गाडीने थेट लमायुरूला निघून गेले. आजचा आमचा पल्ला होता "शकर दो" ते "हेनिस्कोट". एकूण अंतर होत साधारण 30/35 किलोमीटर, अणि मुख्य म्हणजे त्यात कालच्या इतका भयंकर चढ नव्हत. म्हणून निवांत रम्मत गम्मत निघालो.
सकाळच्या वातावरणात मस्त मजा येत होती सायकल चालवायला. आजचा रस्ता हा विराण डोंगरातून नाही तर कारगिल च्या छोट्या छोट्या गावातून जात होता. मोजकी मोजकी घरं अणि थोडी फार शेतं असलेली चिमुकली गावं. गावातून पास होताना लहान थोर सारे रस्त्यावर येऊन आमच्याकडे कुतूहलाने पाहायचे.. त्यात लहान लहान मुल तर धावत रस्त्यावर येऊन टाळी साठी हात लांब करायची.. आम्हीही मग सायकल एका हाताने सांभाळून दुसर्या हाताने त्यांना अलगद टाळी द्यायचो.. टाळी मिळाल्यावर काय आनंद व्हायचा त्यांना.. निव्वळ निरागस..!! आईच्या कुशीत किंवा पाठीवर असलेली गोबरी गोबरी बाळं देखील आपले मीचमीचे डोळे आमच्याकडे करून हात हलवायची.. आम्हीही हात द्यायचो.. एक वेगळाच अनुभव होता हा.. गोडचं..!! त्यात रस्ता ही निवांत रमल्यासारखा चालत होता.. ना कसली घाई ना कसली फाजील चढाई.. साधारण अकरा वाजेपर्यंत आम्ही "खंग्राल" गाठलं होत. खांग्राल म्हणजे साधारण अर्धे अंतर कापल होत. पुढे उरल होत फक्त 12/15 किलोमीटर.. आणि रस्ता होता "NH-1 श्रीनगर लेह हायवे'.. म्हणजे सुसाट..तेज..
हायवेला लागल्या लागल्या थंड सरबत मारलं अणि ठरवलं आजच दुपारच जेवण थेट हेनिसकोट ला जाऊनच करायच. सुरुवातीला खंग्राल पर्यंत 1-1, 2-3 गियर वर सायकल चालवत होतो पन जस हायवे लागला.. तस गियर थेट 2-5, 3-6 ला शिफ्ट झाले अणि दुप्पट जोमाने सायकली पिटाळल्या.. तेव्हा हायवे ही मस्त अधून मधून चढ आणि अधुन मधुन उताराच्या मूड मध्ये होता.. रप रप रप सायकायल मारताना काही क्षण आपण सायकल चालवत आहोत की मोटार सायकल तेच कळत नव्हतं.. मजा आली. पण मग एका पॉईंट नंतर हायवे राव एकदम रुसले आणि सपासप वर चढू लागले.. इथे दुपारी हेनीसकोट गाठायचे आमचे मनसुबे पार हायवेला मिळाले.. आणि अखेर 12/12.30 आम्ही "बोधखरबू" मधे पाहिला ब्रेक घेतला.. एका छोट्या टपरीवर थांबलो.. काहीतरी खायची इच्छा होती.. पण त्याच्याकडे अंडी आणि मटण मोमोज सोडून काही नव्हतं. मग काय थेट डबा उघडला अणि जेवण आटोपल. जेवणानंतर मात्र ऊन अजूनच वाढल अणि हायवे देखील खूप सतावू लागला. पन मजल दरमजल करत 2 वाजता आम्ही हेनिसकोट गाठलं (तरी त्या मानाने बरच लवकर).
हेनिसकोट ला जातानाच आम्ही कॅम्प जवळ असणार्या एका गावाबद्दल ऐकल होतं.. त्याच नाव होत "Invisible Village" (अदृश्य गाव).. नावापासून च गावा बदल उत्सुकता वाढली होती. कॅम्प ला पोहचून सायकली ठेवल्या अणि निघालो आम्ही या अदृश्य गावाच्या शोधात.. आजूबाजूची शेत, बांध, कुंपण ओलांडत ओलांडत आम्ही एका डोंगराच्या पायथ्याला पोहचलो.. तिथून वर डोंगराच्या टोकाला थोड पडक्या वाड्यासारख काहीतरी दिसत होत.. विचारल्यावर कळल ते एक वास्तू संग्रहालय आहे.. आणि तिथे गेल्यावर Invisible Village विजिबल होत. मग काय सुरू केला खडा ट्रेक.. साधारण एक तासाच्या खड्या (सायकल विरहित) चढाई नंतर ते पडकं museum आल, आम्ही ते बाजूला टाकून थेट वर गेलो अणि डोंगराच्या पलीकडच्या बाजूला पाहिल.. येस.. खरंच.. एक गाव होत तिथे.. चारी बाजूने डोंगरांनी वेढलेलं.. म्हणजेच invisible.. सहसा कुठलाही मुख्य रस्त्याने जाताना डोंगराच्या कुशीत लपलेले हे गाव कुणालाही दिसत नाही.. आणि ते तसच अदृश्य राहत.. म्हणून हे Invisible Village..!! तिथून फक्त ते गावच नाही तर संपूर्ण परिसर फारच सुंदर दिसत होता.. बराच वेळ तिथे घालवून शेवटी आम्ही बेसला परत आलो..
खाली येईस्तोवर गारठा फारच वाढला होता.. इतका की गेल्या दहा दिवसात इतकं थंड आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.. आल्या आल्या आम्ही चक्क पांघरुन घेऊन ताणून दिली.. जाग आली ती एका आवाजाने "जवानो, पकोडे और चाय तय्यार है ले लो". मस्त स्वेटर कानटोपी घालून बाहेर बोचर्या वाऱ्यात भजी आणि चहा..! आहा..!! युथ होस्टेल वाले जे लाड करतात ना माझे यार त्याला जगात तोड नाही..! भजी आणि चहा नंतर साधारण 7 वाजता पुन्हा सूप आलं.. आणि आठ वाजता तर जेवण तय्यार.. इतक मनापासून काळजी आणि लाड केल्यावर कुणी का बर सायकलिंग करणार नाही, तुम्हीच सांगा.! जेवल्यावर थेट झोपायला हवं होत.. कारण थंडी प्रचंड होती आणि स्लीपिंग बॅग आम्हाला जवळ बोलवत होती.. तरी तिचा मोह बाजूला सारून बाहेर फेरफटका मारायला गेलोच.. कारण एकच.. काल अनुभवलेला लाईट आणि साऊंड शो.. आभाळात गच्च भरलेली ताऱ्यांची जत्रा.. त्यात थांबलेले.. फिरणारे.. घसरणारे.. अगणित तारे.. त्यांना सामावून घेणारी आकाशगंगा.... आणि.. आणि.. तो नदीचा आवाज..
Comments
Post a Comment