Leh Diary (Day-1)
जुले..
आज अगदीच निवांत ऊठलो. खरंतर स्लीपिंग बॅग मधून बाहेरच यावस वाटत नव्हत. काल गृप जमा झाला होता पण ओळखी मात्र झाल्या नव्हत्या. आज सकाळी नाश्ता करताना हळू हळू नावागावा सकट परिचय झाला. गम्मत म्हणजे एकूण 15 जणांपैकी जवळ जवळ 10 जण महाराष्ट्र मधून आहेत. म्हणजे लेह मधल्या नॅशनल लेवल सायकलिंग कॅम्पची भाषा (बहुमताने) मराठी झालीय. नाश्ता अगदीच दाबून केलाय. इथले जे विकास शेफ आहेत ते शेफ मी आधी उटी सायकलिंग केलं तेव्हा होते. मग काय गप्पा गप्पांमध्ये आग्रह झाला आणि ग्रहन ही झालं. या साऱ्या yhai ग्रुप च आणि माझं एक वेगळच नात आहे अस वाटत.. ही सारी जमात मला माझी वाटते आणि मी त्यांच्यातला आहे असं वाटतं. Love love YHAI
नाश्ता झाल्यावर लगेच आम्ही लमायुरू साठी प्रस्थान केलं. लेह पासून लमायुरू आहे साधारण १२० किलोमिटर... बऱ्यापैकी घाट रस्ता आहे.. त्यामुळे साधारण ३-४ तास लागतात. आणि गंमत म्हणजे हा पूर्ण वेगळा रुट आहे.. (जो की वृषाली सोबत फिरताना राहून गेलाय). आमच्यासोबत पूर्ण बस मध्ये yhai चा कुणी leader मेंबर नव्हता.. त्यामुळे आम्ही ड्रायव्हर ला एकदम हायजॅकच केलं होत. आम्ही त्याला आम्हाला जिथे वाटेल तिथे त्याला गाडी थांबायला लावत होतो आणि मनमुराद सफर अनुभवत होतो. जाता जाता पहिला ब्रेक घेतला तो.. "मग्नेटिक हील" ला. बरेच YouTube व्हिडिओज, गुगल बाबा यांनी मग्नेटिक हील बद्दल बरच काही सांगितलं होत. आम्ही ही आमची गाडी बाजूला थांबून बराच वेळ रस्त्याकडे बघत थांबलो.. बरेच कारवाले येत होते.. गाडी रस्त्यावर थांबवत होते.. गियर नुट्राल करत होते.. पण गाडी काही पुढे सरकत नव्हती. सरकलीच तर थोडीफार मागे सरकत होती.. जो की उतार होता.. पण दिसताना चढ दिसत होता. म्हणून मग्नेटिक हील कितीही मग्नेटिक असली तरी आम्ही काही तिथे फार वेळ चिकटलो नाही.
थोड पुढं गेलो की पुन्हा ब्रेक घेतला..तो म्हणजे "संगम" ला. संगम म्हणजे जिथे इंडस आणि झांस्कर अश्या दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण. सुरेख जागा आहे. दोन्ही बाजूने येणाऱ्या दोन वेगळ्या नद्या.. अगदी त्यांच्या पाण्याचा रंग ही वेगळा.. इंडस म्हणजेच सिंधू नदी चमकदार निळी, तर झांस्कर गढूळ हिरवी.. अस म्हणतात संगम येथील दोन नद्यांचे प्रवाह ऋतुमानानुसार बदलतो. उन्हाळ्यात झंस्कर नदी फुगलेली आणि तेज असते, तर सिंधू नदी शांत असते. हिवाळ्यात, झंस्कर चा प्रवाह मंदावतो, जवळजवळ गोठतो तर सिंधूचा प्रवाहही कमी होतो. सिंधू ही आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे आणि तिबेटमध्ये उगम पावते, तर झांस्कर नदी झंस्कर खोऱ्यात उगम पावते. पण संगम नंतर एक होऊन पुढे एक होऊन वाहतात.. मिले सूर मेरा तुम्हारा.
तिथून पुढे मात्र आम्ही थेट लमायुरू गाठल. कारण, आज आम्हाला फक्त तिथे पोहचायच नव्हत तर तिथे पोहचून टेस्ट राईड सुद्धा करायची होती. पुढे अगदी लामायुरु च्या आधी एक अफलातून रस्ता लागला.. दोन्हीं बाजूला अगदी उंचच उंच पहाड, अगदी घळीतून निघणारा वळणदार रस्ता.. खळखळत वाहणारी इंडस नदी आणि.. अधून मधून दिसणाऱ्या अगदी वेगळ्या टेकड्या. त्या टेकड्याचा आकार, रंग आणि ठेवण, चंद्रावर जशी जमीन आहे तशी आहे. त्यामुळे याला "मुनलँड" म्हणतात. अफलातून आहे सार..
लमायुरु कॅम्प ला पोचलो तेव्हा साधारण १/२ वाजले होते.. त्यामुळे उतरून बॅग तिथेच ठेवली.. आणि डबे हातात घेऊन थेट जेवणावर ताव मारला. जेवता जेवता बऱ्याच नव्या मंडळींचा परिचय झाला .. गप्पा झाल्या.. काही जण सायकलिंग संपवून परत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होत ज्यात आनंद होता, थकवा होता, काहीतरी अद्भुत अनुभवल्या ची भावना होती.. आणि कुठेतरी "सुटलो बाबा एकदाचा" असा निश्र्वास सुद्धा होता. प्रत्येकाचे अनुभव वेगळे होते.. त्यांच्या ग्रुप मधल्या सगळ्या जणांनी काही सायकलिंग पूर्ण केलं नव्हत.. काही जणांना त्रास झाला त्यांनी परत जाण पसंत केलं होत. ते पाहून आम्हाला या पहाडांमधे आमच्यासाठी काय वाढून ठेवलंय याचा पुरेपूर अंदाज आला. पण डर के आगे जीत है .. आणि पेडलिंग अपना हिट है!! म्हणत आम्ही मनाची समजूत घातली..
कॅम्प साईट अगदी छोटीशी आहे.. ४-५ टेन्टस आहेत.. जवळ एक टपरी कम कॅफे कम हॉटेल.. आणि चहूकडे पहाड. जेवण झाल्यावर साधारण अर्धा तास आराम केला आणि लगेच बाहेर येऊन सज्ज झालो.."टेस्ट राईड" साठी. सुरुवातीला सायकलिंग किट च वाटप झालं.. हेल्मेट, रिफ्लेक्टर, ग्लोव्हज, बंजी कॉड आणि एक बॅग. बॅग यासाठी की इथून पुढे पूर्ण राईड भर आम्हाला आमचं समान आमच्या सायकल वर बांधून वागवयच आहे. किट वाटप कार्यक्रमानंतर एक पद्धतशीर मार्गदर्शन सत्र झालं.. ज्यात कॅम्प लीडर मिथुन दास यांनी नवख्या मंडळींना गियर्स कसे शिफ्ट करायचे, सीट ची उंची कधी किती ठेवायची, पुढचे रस्ते, ट्रॅफिक.. इत्यादी बद्दल व्यवस्थित माहिती दिली. साधारण तासाभरानंतर आम्ही सायकल वर टांग टाकली. टेस्ट राईड फक्त आठ किलमीटर ची होती पण प्रत्येकाला पूर्णतः "टेस्ट" करणारी होती. कारण, पूर्ण पूर्ण संपूर्ण आठ किलोमीटर खडा चढ होता. सुरुवात करताना तोऱ्यात २-४ गियर टाकले होते.. पण काही क्षणातच ते १-१ वर आले. राईड मधे चढ एक गोष्ट होती पण श्वास घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. १-१ पुश करताना ही छाती भरून येत होती आणि घसा कोरडा पडत होता. पण तरीही मजल दरमजल करत स्वतःला खेचत होतो. बरेच जण खाली उतरून थेट "दें धक्का" योजना राबवत होते. काही जण मात्र झपकन पुढे निघून गेले होते. मला आठ किलोमीटर ला साधारण ३ तास लागले असावेत.. वर पोचलो तेव्हा हुश््श झालं. थोड पाणी प्यायलो आणि तुरंत खाली उतरलो. चढताना जिथे ३ तास लागले तिथे उतरताना मात्र १५-२० मिनिट लागली. सायकल असला तुफान वेग घेत होती की.. पापणी लवेपर्यंत एखाद वळण पुढे यायचं. प्रचंड सावध राहून, मागचा ब्रेक ६०% आणि पुढचा ३०% आवळून..जपून खाली उतरलो. शंभो.. आनंदा.. येताना वन पिस मध्ये आला आहेस जाताना ही वन पिस मधेच जायचं आहे रे बाबा...
आता रात्रीचं जेवण झालंय.. चपाती, भाजी, डाळ, भात, पापड आणि गुलाबजाम.. (किती गुलाबजाम खाल्ले हे विचारू नका).
अन्नदाता सुखी भव.
जेवणानंतर थोड्या वेळाने बोनविटा असणार आहे.. तोपर्यंत नागरगोजे सर म्हणाले "चला जरा वॉक करून येऊ.." बाहेर मिट्ट अंधार होता.. त्या अंधारात पहाड अगदी शांत ऋषी सारखे भासत होते.. आम्ही थोड अंतर चालल्यावर रस्त्याच्या कडेला बसलो.. आणि वर पाहिलं.. अख्खं आभाळ ताऱ्यानी गच्च भरलं होत.. सप्तर्षी, आकाशगंगा, सार सार स्पष्ट आणि अगदी जवळ जाणवत होत. बराच वेळ कुणी काही ही बोलत नव्हत.. कसलीही हालचाल नव्हती.. होती निरव शांतता .. मिट्ट काळोख.. निद्रस्त पहाड.. आणि भरलेलं आभाळ...
Click here to read previous Leh diaries:
Leh Diary (Day-0)
Comments
Post a Comment