Leh Diary (Day-2)


जुले..

आज तशी उठायची अजिबात घाई नव्हती पन YHAI च्या प्रथेनुसार लवकर जाग आली. उठल्या उठल्या पटकन दात घासले, तोंड विसळल आणी सरळ नाश्ता हाणला (आंघोळ करायचा प्रश्नच नव्हता). आज नाश्त्याला इडली होती..5-6 इडल्या तोडल्यावर जरा कुठ पोटाला आराम मिळाला आणि पायाला पेडल मारायचा उत्साह आला. कालच्या टेस्ट राईड च्या मानाने आजचा पल्ला फारच मोठा होता. आज आम्हाला जायच होत सुकरबुचन ला. म्हणजे लमायुरू - खलसि - धोमखार - सुकरबुचन एकूण 44 किलोमीटर. आणि तेही आपल आपल समान सायकल वर बांधुन. (आधीच या चढावर शरीराच वजन चढवण जिवावर येत, त्यात 5-6KG सामानाची भर)

राईडची सुरुवात मात्र फारच खास होती.  

काल लेह वरुन येताना बस मधून एक फार सुरेख रस्ता दिसला होता.. दोन्ही बाजूने उंचच उंच पहाड.. त्यातून वळणदार रस्ता अणि बाजूने वाहणारी इंडस नदी. बस मधून उतरून लगेच सायकल हाती घ्यावी अस वाटत होतं. आणी आज नेमकं YHAI आमची हीच इच्छा पूर्ण केली. लामायूरु मधून निघाल्यापासून खालसी पर्यन्त रस्ता म्हणजे गजब सुरेख होता (आणि मुख्य म्हणजे पूर्ण पूर्ण पूर्ण संपुर्ण उताराचा होता). मजा आली.!! त्यात Moonland जवळ ग्रुप फोटो काढल्यावर आर्मीचे जवळ जवळ 10-15 ट्रक पास झाले. त्यांना "जय हिंद" म्हणून सलाम केल्यावर आपले जवान ही त्याला प्रतिसाद देत होते अणि त्यांच्या एका हसू ने आमच्या अंगावर मूठभर स्फुरण चढत होत. असल्या भीषण परिस्थितीत आपल्या जवानांच काम, त्यांच्या चेहर्‍यावरच स्मित खरच स्तिमित करून जात. 


खालसी पर्यन्त रस्ता पहाडातून आरामात उतरत होता.. पन खालसी नंतर मात्र रस्त्याने रूप पालटल अणि हळूहळू आमची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आमच्यातल्या काही जणांनी प्रतेक चढाला "दे धक्का" कार्यक्रम अवलंबला होता. सायकलवरून उतरून चढ संपेस्तोवर सायकल ढकलत ढकलत पुढे नेत होते. पण माझ हिमाचल पासूनच व्रत मात्र मी आजही मोडल नाहि, "काहीही झालं, कितीही वेळा थांबव लागल तरी सायकल ढकलत न्यायची नाही". त्यामुळे कधी कधी ढक्कल गाडीवाले माझ्या पुढे निघून जात होते, पण मी मात्र पॅडल करतच चढ चढत होतो. 

पुढे गेल्यावर मात्र चढा बरोबर उतार ही मिळाले अणि सफर एकदम सुहाना होऊन गेला.  दुपारी धोमखार पुढे ज्या ठिकाणी जेवणासाठी थांबलो ती जागा तर निव्वळ स्वर्ग होती.  अगदी बाजूने वाहणारं फेसाळ बर्फाच पाणी..अणि त्याबाजुला झाडाखाली कठड्यावर मस्त जेवण.. वाह.. पाणी प्यायच असेल तर फक्त हात खाली करून बाटली थेट पाण्यात बुडवायची अणि थंडगार पाण्याने शरीर अणि मन तृप्त करून घ्यायच. आजवर केलेल्या जेवणापैकी हे आजच जेवण सगळ्यात बेस्ट जागी होतं. जेवण झाल्यावर मात्र तिथून हलायची मुळीच इच्छा नव्हती पण घोटाळनारे पाय पिटाळत आम्ही सायकली पुढे हाणल्या. पुढे 5-6KM गेल्यावर Rock ART गार्डन ला ब्रेक घेतला.  तिथे असलेल्या घरात गेल्यागेल्या भारी वाटलं.  कारण ते घर पूर्ण लडाखी होत. तिथली बैठक व्यवस्था तिथली भांडी, लोक, त्यांनी केलेल स्वागत सार एकदम लडाखी. तिथे बसल्या बसल्या समोर लक्ष् गेले तर समोर प्रत्येकासाठी जरदाळू (Apricot), सफरचंद,  अक्रोड, बदाम असा मनमुराद मेवा ठेवला होता. (त्याचा आम्ही तितकाच मनमुराद आस्वाद घेतला हे काही वेगळ सांगायला नको). त्यानंतर आला लडाखी चहा.!! हा आयटम मात्र बर्‍याच जणांना रुचला नाही.. कारण हे फारच नवीन प्रकरण होत. त्यात दुधाबरोबर आपल्यासारखी चहापत्ती अणि साखर नव्हती तर दुधात लोणी (butter), मीठ अणि अजून काहीतरी होत. खरतर याला चहा म्हणाव की नाही तेच कळेना पण हा चहाच होता पण लडाखी स्टाईलचा. त्यानंतर जवळच वाहणार्‍या इंडस नदी काठी चक्कर मारली.  तिथे खडकावर सुमारे 3000/4000 वर्षापूर्वी आदिमानवाने कोरलेली चित्र होती. चित्र विचित्र प्राणी,  माणसांचे आकार, पक्षी,  नक्षी... एका क्षणात मला आपल्या वारली चित्रकलेची आठवण झाली.  Rock ART गार्डन फिरून झाल्यावर मात्र आम्ही पुन्हा सायकलवर टांगा टाकल्या ते थेट सुकरबुचन लाच खाली उतरलो.  रस्त्यात पोटभर चढ मूठभर उतार मिळाले पण जमेल तसं 1-1 गियर वर सार सुखरूप पार पडल.

आल्याआल्या सायकली बाजूला टकल्या अणि जमिनीवर पाय लांबवून बसलो. कुणी काही काही बोलत नव्हत.. डोक्यावरच हेल्मेट, अंगावरच reflector देखील काढायचा भान नव्हत. फक्त शांत बसुन राहावं वाटत होत. या तंद्रीतून आम्ही भानावर आलो ते एका आवाजाने, "चलो चलो वेलकम drink ले लो". प्रतेक ठिकाणी पोचल्यावर वेलकम drink असतच असत अणि आज वेलकम drink झाल्यावर काहीवेळाने लगेचच बटाटे वडे अणि चहा आला. अन्नदाता सुखी भव.

इथली कॅम्प साईट फारच अफलातून आहे.. tents च्या समोर जवळ जवळ 2000 फुटाचा खडा पहाड आहे.. जणू खडी भिंतच.. आता अंधारात समोरच्या काळ्या भिंतीवर चांदण्यांच छत असल्यासारख वाटतय... लखलखतं.. चमचमतं..










Click here to read previous Leh diaries:


Leh Diary (Day-0)

https://www.firasti.in/2022/09/leh-diary-day-0.html


Leh Diary (Day-1)

https://www.firasti.in/2022/09/lehdiaryday1.html


Comments

Popular Posts