Leh Diary (Day-3)
जुले..
आजच्या रस्त्या बद्दल पाहिल्या दिवसापासून ऐकून होतो. त्यात काल ग्रुप लिडर पासून ते मेकॅनिक पासून ते कूक पर्यंत सगळ्यानी सांगितल होत, "जवानो, आज का तो कुछ नही था, कल मेहबूब बेकरी के बाद का दस किलोमीटर का चढाई देखिय.." कॅम्प मधला प्रत्येक जण या चेतावणी ने आधीच टरकला होता. इतका की आज उठायला नाश्ता करायला आणि निघायला पार 8.45 वाजले. ऊन एकदम डोक्यावर आल होत, जणू आमची मजा बघायला सूर्य देव तयारीनेच आले होते. एकदा सुरू झाल्यावर मात्र प्रत्येकाने जोरात सायकली हाणल्या. रस्ता ही मस्त होता... पहाडा पहाडातून, इंडस् नदीच्या बाजूने वळणदार चढ उतार.. आहाहा मजा आली. सुरुवातीचे तीस किलोमीटर मारून आम्ही 12/12.30 लाच मेहबूब बेकरी गाठली. जसं आजच्या चढाई बद्दल ऐकल होत तसच या बेकरी बद्दल ही बरच ऐकल होत. "मेहबूब का पेस्ट्री, मेहबूब का बिस्किट.. मेहबूब का हर चीज लाजवाब है.. बिना कुछ खावे आगे जाना पाप है.." मला तर वाटत पहिले तीस किलोमीटर दणक्यात मारले त्यामागे मेहबूब च मोटिव्हेशन होत. मेहबूब दिसल्या दिसल्या सायकली रोड ला आडव्या करून आम्ही थेट आत शिरलो. पेस्ट्री, क्रीम डोनट, चॉकलेट डोनट, गुलाबजाम अस जाम काहीतरी खाऊनच बाहेर पडलो. मनात म्हटलं, अन्नदाता सुखी भव..!
आता बेकरीची बातमी खरी ठरली होती. आणि आम्हाला प्रामाणिक पणे पुढच टेन्शन आल होत. कारण पुढचे 10 किलोमीटर चि चढाई कशी सर करायची? ऊन तर पार त्रास द्यायला लागल होतं, त्यात मेहबूब मध्ये बराच वेळ गेला. म्हणून कॅम्प लिडर ने इथेच जेवून घ्या सांगितल.. पण तरी आम्ही मात्र हळूहळू पुढे जाण पसंद केल. म्हटलं थोडा चढ मारू अणि दम लागेल तेव्हा चांगला स्पॉट बघून जेवण करू. पण चढ लागला तो असा खतरनाक लागला की जेवण तर लांबच, पण तोंडच पाणी देखील पळून गेलं. एक इंच सुद्धा उतार नाही की साधा सपाट रस्ता नाही. फक्त अणि फक्त आणि फक्त चढ चढ चढ. काही मिनिट सायकलिंग केल की अशी धाप लागत होती की थांबताना डोक्यावर ऊन आहे की सावली याचाही भान राहत नव्हत. बर्याचदा मी सायकल रस्त्यावर आडवी टाकून उन्हात धुळीत च बसकण मांडली. ना कपड्यांच भान होत ना सायकलचं. पाच दहा पंधरा मिनिट थांबून फक्त धाप शांत करायचो, कारण पाय तर सुन्न झाले होते त्यांना त्यांचच काही काळात नव्हत. अश्यावेळी बाजुने खळखळ वाहणारी नदी कितीही सुंदर असली तरी ती आपल्याला फिदीफिदी हसतेय असच वाटत होत. पण अश्या परिस्थितीत सुद्धा.. थांबून थांबून का असेना.. इंच इंच सायकलिंग चालू होतं.
आमच्या 15 च्या ग्रुप मधले 5 जण आज सायकली थेट गाडीत टाकून पुढे गेले. त्यातल्या दोघांच्या तब्यती खराब झाल्या आणि तिघाजणांनी या खतरनाक चढाई समोर हात टेकले होते. काही बहाद्दर मात्र सनसन करीत पुढे निघून गेले होते. आणि बाकी आमच्यासारखी पामर जनता आपल्या आपल्या परीने मजल दरमजल करत पेडल करीत होती. काही किलोमीटर नंतर तर रस्ता पण कच्चा झाला.. डांबरी पक्क्या रस्त्याच्या जागी मातीचा खडबडीत रस्ता आला (पण चढ मात्र तसाच होता). इंच इंच चालवणं सुद्धा जीवावर आल होत. अश्यात चमत्कार व्हावा तस मदतीला धावून आली ती जरदाळू (Apricot) ची बाग..!! मी आणि अजून एक जण अगदी मेटाकुटीला आलो असताना आम्हाला ही बाग दिसली आणि आम्ही अक्षरशः तुटून पडलो. सायकली बाजूला टाकून दणादण Apricots खाल्ले. कमीतकमी 20/24 तरी खाल्ले असावेत. काय चव होती त्यांची... वाह.. क्षणभर सायकल, रस्ता सर्वाचाच विसर पडला होता. धन्य ते appricots आणि धन्य ते त्यांचं टायमिंग.. वाह.. (ज्याची बाग होती त्याला साष्टांग दंडवत..). appricots वर ताव मारताना काही वेळ एकदम वेगळ्या दुनियेत शिरलो होतो..पण.. मग भानावर आलो तेव्हा रस्ता आणि बर्यापैकी ओझं बांधलेली सायकल समोर आली. आणि हळू हळू appricots क्या बिया चघळत चघळत पुन्हा सायकलींग चालू केलं.
सायकलींग चालू केलं पण रस्ता काही संपत नव्हता.. सहा किलोमीटर, पाच पॉईंट आठ किलोमीटर, पाच पॉईंट एक, चार पॉईंट सात... अगदी काही मीटर मोजत मोजत आम्ही पुढे सरकत होतो. काही बहाद्दर सायकल थेट ढकलत ढकलत चालत होते. पण आमच मात्र ठरल होत काही झाल तरी, "ढकलेगा नही साला". शेवटी तीन किलोमीटर असताना ज्या पहाडा भोवती रस्ता चढत होता त्या पहाडा च टोक दिसायला लागलं आणि गर गर गर वर चढणारा रस्ता दमून गेल्यासारख सरळ चालायला लागला (तरी उतार नाहीच). मग आम्हाला आमच्या सायकलला 1-1 च्या पुढे ही गियर आहेत याचा साक्षात्कार झाला अणि 1-3, 2-4 गियर वर आजची कॅम्प साईट गाठली. टुरिस्ट फॅसिलिटेंशन सेंटर "शकर दो"..!!
पोचल्या पोचल्या थेट रूम मध्ये जाऊन पाठ टेकली, डोळे बंद केले.. डोळ्यासमोर तरीही चढच होता. हातात सायकलच हॅन्डल होत आणि गियर होते 1-1.! बराच नुसत पडून होतो. काही वेळा ने उठून थेट बाथरूम मध्ये शिरलो अणि थंड गार पाण्याने आंघोळ केली अणि खऱ्या अर्थाने शुद्धीत आलो. जरा आराम केल्यावर पोटात कावळे ओरडायला लागेल होते, तेव्हा लक्षात आलं आपण आज दुपारच जेवणच केल नाहिये, डब्बा तसाच होता. भाजी खराब झाल्याने तो टाकून द्यावा लागला. (तोवर कुणीतरी एक कलिंगडाची सोय केली.. ते खरडून खरडून खाल्लं)
रात्री 8 ला तिवारीजी चा आवाज आला अणि पटकन जाऊन जेवण घेतल (अर्थात हाणल.) अफलातून. शेवटी गरमागरम जिलेबी हाणली अणि आत्मा भरून पावला. जेवल्यानंतर सहज चालायला बाहेर पडलो.. जवळच्या एका पुलावर जाऊन शांत उभा राहिलो.. पुलाखाली पाण्याची मस्त खळखळ चालली होती.. आणी पुलाच्या लांब वर आभाळात तार्यांची गच्च शाळा भरली होती. खालचा आवाज आणि वरच दृश्य..
एक अद्भुत light & sound show पाहून आजचा दिवस संपला..
Comments
Post a Comment