हि मा च ल डा य री (Repost - 5)



आजची सकाळ बरीच टेस्टी होती. कारण नाश्त्याला गरमागरम पुरी भाजी आणि खीर होती. वाह.. युथ हॉस्टेल वाल्यानी केलेल्या जेवणाला खरच काही तोड नाही. मजबूत खाल्ल्यावर साधारण 9 ला रस्त्याला लागलो. "जिभी ते सोझा" बद्दल पहिल्या दिवसापासून खूप काही ऐकलं होतं. "सगळ्यात खतरनाक रस्ता म्हणजे 'जिभी ते सोझा'..!", "सगळ्यात जास्त uphill म्हणजे 'जिभी ते सोझा'..!" आणि " सगळ्यात खराब रस्ता म्हणजे 'जिभी ते सोझा'..!" त्यामुळे हे 'जिभी ते सोझा' काय प्रकरण आहे हे अनुभवायचंच होतं.

'जिभी ते सोझा' पूर्ण अंतर आहे फक्त 6km. ठाण्यात किंवा महाराष्ट्रात 6km रस्ता सायकल ने पार करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास ते एक तास लागतो. पण इथं.. हिमाचल मध्ये..
'जिभी ते सोझा' *6km* रस्त्याने आमचे *8 तास* घेतले. आणि खरं सांगायचं तर आमची मजबूत मजबूत वाट लावली. कारण या रूट बद्दल ऐकलेला शब्द न शब्द 100% खरा होता. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त आणि फक्त uphill आणि अतिशय खतरनाक चढच चढ होते. त्या चढावर पेडल मारून सायकल वर चढताना अक्षरश: सायकलचं पुढचं चाक वर होत होतं आणि पूर्ण तोल जात होता. त्यात जवळ जवळ 80% रस्ता अतिशय खराब होता, कुठे कुठे फक्त खडी होती तर कुठे फक्त माती. कुठलीही गाडी पास होताना आम्हाला सायकल रस्त्याच्या बाजूला घ्यावी लागत होती आणि पूर्ण तोंड झाकून घ्यावं लागतं होतं. कारण उडणारी धूळ अतिशय खूप त्रासदायक होती. या अतिशय भयानक परिस्थितीतही एक गोष्ट आमच्या मनात पक्की होती, ती म्हणजे " काही हि झालं तरी सायकल हातात घेऊन चालवायची नाही, मग कितीही वेळ लागला तरी चालेल".


ठरवल्यानुसार आम्ही इंच इंच पुढे सरकत होतो. रस्ता इतका भयानक होता की पूर्ण रूटमध्ये एकही उतार म्हणून काही नव्हता. या सहा किलोमीटर साठी आम्ही जवळ जवळ *40 ते 50 ब्रेक* घेतले. कारण काही मिनिटं पेडल केल्यावर पुढे जाणेच अश्यक्य होई. आणि तरीही प्रयत्न केला तरी वाईट रस्त्यामुळे पडण्याची भीती असायची. आज आम्ही 6 जण सगळ्यात शेवटी होतो. खूप वेळा विचार आला की "बस्स, आता बस झालं.. खूप झालं सायकलिंग...सरळ गाडीत सायकल टाकावी आणि थेट वर जावं" खूप वेळा वाटलं की "थोडा वेळ तरी सायकल हातात धरुन ओढत न्यावी". पण आम्ही दोन्ही करणं नाकारलं. आणि जमेल तसं जमेल त्या स्पीडने पेडलिंग करणं स्वीकारलं. या जवळ जवळ 8 तासात एक झालं की आमची 6 जणांची मैत्री खूप छान झाली.

शेवटी 5 ला वर "सोझा" ला पोहचलो तेव्हा एक समाधान स्पष्ट आमच्या चेहऱ्यावर होतं. वर पोहचल्यावर कॅम्प साईट मधून दिसणारा हिमालय निव्वळ अफलातून आहे. मी बराच वेळ काही हि न बोलता फक्त त्याकडे पाहत बसून होतो. डोक्यात कुठलाही विचार नव्हता. फक्त समोर हिमालय आणि स्वछ आभाळ.
तो अफाट डोंगर.. त्याच्यावर असणारी वेगवेगळी झाडं.. त्यांचे वेगवेगळे आकार.. खोल दरी.. आभाळ.. त्यातले ढग.. तो निळसरपणा.. अधून मधून चमकणाऱ्या विजा.. सारंच निव्वळ शब्दातीत आहे. आता इथं सोझा मध्ये खरंच खूप मस्त वाटतंय, इथला गारवा अगदी बोचरा आहे पण तरीही हवाहवासा आहे. (मजबूत) जेवून मी आता स्लीपिंग बॅग मध्ये पूर्ण शिरलोय.. अंग पूर्ण थकलय.. आणि हि जागा मला सुचवतेय "आनंद... सोझा"

- आनंद







Click on the link below to read previous Diary :
https://www.firasti.in/2019/10/Himachaldiaryrepost-4.html

Comments

Popular Posts