हि मा च ल डा य री (Repost - 6)



कालचा खतरनाक चढ चढल्यावर असं वाटत होत की आज कमीत कमी 8 पर्यंत तरी खलास झोपावं. पण इकडं अराम ही फक्त अंधश्रद्धा आहे. आज सकाळी 6 ला उठून 7 पर्यंत नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला तयार होतो. तस पाहता आज सकाळी सायकलिंग नव्हतं. आज होता ट्रेक, 'जलोरी पास' ट्रेक.


सोझा ते जलोरी हा प्रवास आम्ही open jeep ने केला. छोटासा जलोरी ट्रेक करून  lake पाहायचा म्हणून आम्ही अगदी casuals घालून बाहेर पडलो होतो. अगदी मस्ती च्या मूड मध्ये. जलोरी पर्यंतचा 5km चा रास्ता अतिशय सुंदर होता. दोन्ही बाजूने उंचच उंच झाडी, वळणदार रस्ता आणि सोबतीला असणारे पहाड. गप्पा गाणि करत करत अर्धा तासात जलोरी गाठलं. पण खरी हालत झाली जलोरी पोहचल्यावर. कारण सोझा पासून आम्ही बऱ्याच उंचीवर आलो होतो. (10,200 ft.)त्यामुळे थंडी अतिशय बोचायला लागली होती. पहिल्यांदाच "हाडं गोठवणारी" थंडी म्हणजे काय ते आम्ही अनुभवल. त्यात जलोरी ते तलाव 5kmच अंतर आम्हाला चालत पार करायचं होतं. पण हा पाच किलोमीटर चा रूट नितांत सुंदर होता. उंच झाडीतून जाणारी नागमोडी पायवाट आणि मजबूत थंडी. एकदा हलकेसे थेंब हि पडून गेल्यामुळे गारवा अजून वाढला होता. पण सोबतची दर्दी मंडळी आणि धुंद गप्पांमुळे आम्ही हा सारा ट्रेक खूप enjoy केला. खरं सांगायचं तर ग्रुप मधला प्रत्येक जण एक जिवंत पुस्तक आहे. प्रत्येकाची कहाणी अतिशय रोमांचक आणि वेगळी आहे. आणि ती ऐकणं हेच मला खूप काही शिकवून जाणारं होतं. जे या दोन-तीन तासांच्या ट्रेकमुळे अनुभवता आलं, ते कदाचित 10 पुस्तकं वाचूनही कळलं नसतं. मजा आली.

पुढे दुपारी 1 दरम्यान आम्ही सोझा कॅम्प ला परत आलो. कारण पुढे आम्हाला जिभी पर्यंत सायकलिंग करायचं होतं. खरतर आज फक्त आणि फक्त उतार होता. पण तोच भयानक उतार. त्यामुळे जरी फक्त 6km उतरायच असलं तरी सायकलवर मजबूत पकड असणं खूप गरजेचं होतं. कारण रस्त्यावरचा एक छोटासा खडा ही आम्हाला वाईट पद्धतीने पाडण्यास पुरेसा होता. त्यात आज जलोरी ट्रेक हुन सोझा ला येईस्तोवर आभाळ प्रचंड भरून आलं होतं. त्यामुळे पाऊस सुरु होईपर्यंत आम्हाला काही ही करून जिभी ला पोहण भाग होतं. पण बऱ्याच जणांनी जेवणासाठी खूप वेळ घेतला. मग आम्ही 4-5 जणांनी मात्र दिसणारा धोका ओळखून ride चालू केली.

काल ज्या रस्त्याने चढाईला आमचे 8 तास घेतले तोच 6km चा रस्ता आज आम्ही फक्त 20 मिनिटात पार केला. उतरताना दोन्ही हातांवर प्रचंड ताण येत होता. दोन्ही ब्रेक्स अगदी आवळून आम्ही जिभी गाठलं. कारण प्रत्येक वळण अतिशय फसवं होतं आणि त्यात अधून मधून समोरून प्रचंड वेगात गाड्या थेट अंगावर आल्यासारख्या येत होत्या. आम्ही जिभी गाठेपर्यंत वातावरण अजून खराब झालं होतं. सगळं वातावरण अंधारून आलं होतं. आम्ही सायकल ठेवून tent मध्ये आल्या आल्या जोरात पाऊस सुरु झाला आणि आम्ही हुश्श केलं. बाकीच्या बऱ्याच जणांना पावसाने आणि रस्त्याने खूप त्रास दिला. पण चांगली गोष्ट ही कि सारे सुखरूप कॅम्पमध्ये पोहचले.

संध्याकाळी सगळीकडे चिखल चिखल झाला होता त्यामुळे tent बाहेर पडणं अवघड झालं होतं. मग tent मधेच मैफल जमली. दंमशेरास ने धमाल आली. वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळी डोकी, त्याची बोलण्या समजण्याची पद्धत वेगवेगळी आणि त्यात सारेच अगदी ठार वेडे. मग काय धमालच धमाल. गेल्या कित्येक माहिन्यांत मी हसलो नसेल तितका आज हसलो. मजा आली.
इथं पावसामुळे थंडी प्रचंड पडली आहे, त्यामुळे आज लवकरच जेवून सगळे sleeping bag मध्ये शिरले आहेत. पण झोपले मात्र नाहीयेत. बऱ्याच गप्पा चालू आहेत..ट्रेक, सायकल, आयुष्य, मनाली ट्रेक, पाऊस, पुढचा प्लॅन, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि बरच काही. या गप्पांमध्ये एक विषय missing आहे तो म्हणजे झोप. तो येईल तेव्हा येईल पण तोवर मैफिल चालूच राहील..!

- आनंद







Click on the link below to read previous diaries :

https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-5.html

Comments

Popular Posts