जीभेचा जन्म..!!
आजवर बऱ्याच ठिकाणी फिरण्याचा योग आला आहे.. त्या ठिकाणाबद्दल.. अनुभवांबद्दल बऱ्याचदा लिहलं देखील आहे.. पण कधी खाण्याबद्दल मात्र लिहलं नाहीय. कारण, मी खूप चवीने किंवा चवीसाठी खाणारा वगैरे आजिबात नाहीये. मी खातो ते फक्त पोटासाठी.. चिक्कार आडवं तिडवं भटकायचं असतं.. आणि त्यासाठी पोटाची टाकी भरलेली हवी.. कारण त्याशिवाय पाय आणि मन काही चालत नाही. त्यामुळे नाश्ता असो की न्याहारी..मी जेवणासारख "दाबूनच" खातो..
पण आज जळगाव मधला अनुभव मात्र जिभेला चकित करून गेला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील ५-६ जिल्ह्यांत फिरण्याचा योग आला. त्याबद्दल सविस्तर लिहिणचं. पण आज जळगाव मध्ये खाल्लेल्या पदार्थाबद्दल लिहिण्याचा मोह काही आवरता येत नाहीये.. अगदी हाताला पाणी सुटलय..! चला तर मग सारं चवीने खाऊयात (पाहुयात.!)
१. शेगाव कचोरी
सगळ्या खाद्यपदार्थांमध्ये हा माझा त्यातल्यात्यात जरा विक पॉईंट (अगदी वडापाव पेक्षाही जास्तच). कधी काळी चुकूनमाकून मला काहीतरी चवदार खावंसं वाटलंच तर जिभेसमोर पटकन कचोरी येते. आज जळगाव मधे मित्र म्हणाला चल तुला "जोगळेकरची कचोरी" खाऊ घालतो. छोटस.. साधस हॉटेल.. पुढे भली मोठी कढई.., त्याच्यामागे काउंटर.. आणि त्यामागे बसायला ४-५ बकडी. हॉटेल मध्ये गेल्या गेल्या कचोरी सांगितली आणि समोर कचोरी आली. पण मित्राने समोर असलेली कचोरी घेण्यास साफ मना केलं. आम्हाला कढईत पोहणारी कचोरीच खायची होती. आम्ही मग त्या पोहणाऱ्या कचोरीची वाट पाहिली. (अगदी ती पांढरी पासून लाल होईपर्यंत). त्यानंतर टम्म फुगलेली गरमगरम कचोरी समोर आली. धीर, धाडस, उत्साह आणि खमंग वासाच्या आत्मविश्वासाने आम्ही एका बोटाने कचोरी फोडली. फोडल्यासारशी एखाद्या खिंडीतून ढग बाहेर यावे तसे कचोरीतून गरम गरम वाफेचे ढग अलगद बाहेर आले (खमंग वासासहित..!). त्या खमंगतेवर झुलतच आम्ही हळू हळू छोटू तुकडा तोंडात टाकला.. आणि आपसूक (चटका बसला असला तरी) "आह" च्या आधी तोंडातून.. "वाहह" आलं. क्या बात है..!
कडक कडक बाहेरचं आवरण.. त्याला आतून अलबेल चिकटलेलं सार.. यार कमाल पदार्थ आहे हा..!! तशी ठाण्यात कचोरी खाल्ली आहे, पण ही उत्तमच.. दोन गरम गरम कचोऱ्या खाल्ल्यानंतर पोट म्हणत होत "लेका, अजून ५-६ कचोऱ्या ढकल आणि जेवणाची झंझट मिटवून टाक." पण आज कसं कुणास ठावूक पोटापेक्षा जीभ जास्त वळवळत होती. आणि फक्कड कचोरी नंतर माझ्याकडून माझ्या जिभेच्या अपेक्षा फारच वाढल्या होत्या.
२. कचोरी खाऊन झाल्यानंतर मित्राने मला रिक्षात बसवलं आणि रिक्षाला सांगितलं "KBC चला". मला चटकन काही कळेचना हा KBC काय प्रकार आहे. तर KBC म्हणजे "कौन बनेगा करोडपती" नाही तर "कृष्णाजी भरीत सेंटर". पुण्यात जितकी चितळे ची भाकरवडी फेमस आहे तितकं जळगावात KBC फेमस आहे. लोक चक्क रांगा लावून इथ भरीत खायला येतात. घरी कुणी पाहुणे आले तर इथून "भरीत" पार्सल घेऊन जातात. तशिही जीभ जागी झालीच होती.. आणि गेले बरेच दिवस बाहेरच रोटी, भाजी वगैरे खाऊन वैताग आला होता.. काहीतरी घरचं, गावचं आणि वर्जिनल खायचं होतं. नशिबाने गेल्या गेल्या पटकन जागा मिळाली, लगेच ऑर्डर दिली "भरीत आणि बाजरीची भाकर". ऑर्डर येईपर्यंत विचार केला.. आपण किती दिवस झाले बाजरीची भाकर आणि भरीत खाल्ल नाहीये.. चक्क वर्ष झालं की..!! समोर भरीत आल्यावर एक भाकरीचा तुकडा मोडला आणि भरतात बुडवून तोंडात टाकला. वाह.. चुलीत भाजल्याने वांग्याला जो फ्लेवर येतो तो निव्वळ शब्दापलिकडचा आहे.. आणि सोबत बाजरीची भाकर असेल तर.. अगदी जिभेपासून मनापर्यंत प्रत्येक अवयवाला जाणवतं की आपण काहीतरी "आपलं" "आपल्या मातीतलं" खात आहोत. ऑफिस च्या कामानिमित्त फिरता फिरता मुखात असं काही पडेल याची खरच कल्पना नव्हती.. आणि जेव्हा ते पडलं तेव्हा मनातल्या भावना कल्पनेपल्याडच्या होत्या. भरीत खाताना मध्येच जाणवलं की, डोळे पाण्याने भरून आले आहेत.. आणि डोळ्यातलं पाणी चक्क गालावर आलंय.. मला काही क्षण काही सुचेचना..(माझं डोकं उगाच इमोशनल अर्थ लावायला लागलं). पण मग कळलं भरतात वांग्यासोबत हिरव्या मिरच्या सुद्धा चिक्कार टाकल्या आहेत.. मिरचीचा चांगलाच झनका बसला होता.. मग पुढचे काही घास नुस्ती भाकरी खाल्ली. शेवटी किंचित पांढरा भात आणि भरीत खाल्ल. हात धुतल्यानंतर आणि पाणी पिण्याआधी मनाखालच्या पोटातून फक्कड "ढेकर" आला.. अन्नदाता सुखी भव!!
काही म्हणा.. पण आज पोटासोबत मनही भरलं होत.!
३. हॉटेल ला परत जाताना मित्राच्या सूचनेनुसार "दत्त डेअरी" च सुगंधी दूध प्यायलो आणि भरून पावलो.
काय म्हणावं याला काही कळत नाहीये.
तस मी रोज जेवतो.. खूप वेगवेगळं खातो.. घरचं, बाहेरचं, मिळेल ते खातो.. पुरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत खातो.. पण असं कधी काही "क्लिक" झालं काही.
कदाचित, दाताने चावून पोटात अन्न ढकलताना जिभेकडे लक्षच दिलं नाही..
आजवर अन्न चावून आत ढकलने आणि पोटाचं गोडाऊन फुल्ल करने या एकाच उद्देशाने खात होतो. आज पहिल्यांदा दाताने भाकर चावताना जिभेची जाणीव झाली.. आणि त्या जिभेला भरीताचा जादुई स्पर्श झाला.. त्या एका स्पर्शाने जो आनंद मिळाला तो एकदम निर्वणाच..!!
ओम नमो भरीताय नमः !!
जीभ देवी प्रसन्न !!
- फिरस्ती
[माझी ही खाद्य फिरस्ती घडवून आणणाऱ्या मित्राला "आकाश पाटील" याला साष्टांग नमस्कार आणि लक्ष लक्ष धन्यवाद!]
खुप छान.
ReplyDelete