कळसुबाई डायरी..!!



आधी ५.. मग ७.. मग ११.. मग १५ आणि मग..
"बस्स पंधराच.. जास्त नको.. पंधरा खूप झाले.."
"पण, मग बाकीच्यांना काय सांगायचं ?..

"सरळ सरळ 'नाही' सांगायचं.."

"आधी ज्यांनी हो सांगितलं ते १५ जण अंतिम..
बस्स.. बाकीच्यांना थेट "नकार".."

पण मग..
"१५ जण एका जीप मध्ये मावतील का ? मावतील.." "आपण एकमेकांच्या मांडीवर बसून प्रत्येकाला थोडं "adjust" करायला लावायचं.. ट्रेक आहे.. पिकनिक नाही.. आणि हो बजेट मध्ये करायचं आहे न सगळं.."
"पण ज्यांना "नाही" सांगितलं त्यांना ही यायचंय न.. "त्यांनाही ट्रेक करायचाय न.."
"बरं बघू कस जमतंय.."

आदल्या रात्री झोपताना विचार आला..
"आपण थेट बस च केली तर..!!"
आणि डोक्यात चक्र फिरायला लागली.. पण ट्रेक इतकंच ट्रेकच बजेट महत्वाचं होतं.. पण..
चौकशी बघायला काय हरकत आहे..
एकाला विचारलं.. मोठी "रक्कम" कळली.. मग ठरलं.. ये "बस" अपने बसकी बात नही..
आपलं आपण जीप मध्ये कोंबूनच जाऊ..

"पण मग.. बाकीच्यांच काय करायचं..? "
"दोन जीप करूयात.."
ठरलं.. अंतिम आकडा १७ जण आणि दोन जिप्स.. पण बसचं डोक्यात होतच..
अखेर एकाने 'बस' बजेट मध्ये 'बस'वली.. आणि
20 seater Tempo Traveler..बुक झाली..
मग विचार आला, आता अजून ३ जण आले की बजेट पण सांभाळल जाईल आणि ट्रेक पण हाऊसफुल होईल..
सहज दोन तीन फोन झाले.. आणि महाअंतिम आकडा ठरला..२०.. आणि ट्रेक ठरला.. शिखर कळसुबाई..!!

खरतरं, मी एकदा जाऊन आलो होतो कळसूबाईला. त्यामुळे माझी ही दुसरी (आणि दुहेरी) खेप होती. आम्ही बसने रात्री १०.३०ला बारी गावं गाठलं.. बारी मध्ये बारीक बारीक थंडी होती.. पण थंडीचा झपाटा मात्र नव्हता.. पोटभर जेवण केलं आणि मस्त रानात तंबू लावले.. घड्याळात केव्हाच १२ वाजले होते..  प्रत्येक जण झोपायचा मनापासून प्रयत्न करत होता.. पण पाच तंबूमध्ये गप्पा अश्या खचून बसल्या होत्या की.. बिचाऱ्या झोपेला आत शिरायला जागाच नव्हती.. ती मग हळू हळू.. रात्री..१.. २.. ३.३०.. ४.. ला एकेका तंबूत शिरली.. पण.. ५ ला तर तिला बाहेर निघावं लागलं.. कारण, सकाळी लवकरच चढाई करणं गरजेचं होतं.. तंबूबाहेर येऊन शिखराकडे पाहिलं तर.. शिखराच्या वाटेवर काही जण कधीच चालायला लागले होते.. संपूर्ण अंधारात त्यांच्या हातातला उजेड.. जणू चांदण्या शिखर सर करताहेत असाच भास होत होता. आम्ही ही आवरून मग आमच्या हातातल्या, मोबाईलमधल्या "चांदण्या" चालू केल्या आणि सुरू की शिखराची चढाई.. गार गार अंधारात चालायला मस्त वाटतं होत. अधून मधून दम लागत होता पण अगदी धाप किंवा तहान लागत नव्हती.. वीस जणांचा ग्रुप आपल्या आपल्या स्पीड लिमिट नुसार वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागला गेला होता..आणि मजेत चढाई चालू होती.. या साऱ्यात माझ्या "सौ" चा उत्साह ही भलताच चांगला होता.. आणि त्यामुळे माझाही..

कळसुबाई.. तसा सोपा ट्रेक आहे.. पण चालावं खूप लागतं..
पण तीच खरी गंमत आहे.. वेगवेगळ्या वाटा.. अधूनमधून लागणाऱ्या (धडकी भरवणाऱ्या) लोखंडी शिड्या.. वेगवेगळ्या उंचीवरून दिसणारा अद्भुत परिसर.. अलगद समोरच्या डोंगरामागे येणारी लाली.. मग हळू हळू लाजत मुरडत वर येणार सूर्य.. आणि त्यासोबत जाग्या होणाऱ्या सावल्या.. सगळंच कस पोटभर अनुभवावं अस आहे... आणि आरामात चालत चालत असताना हे खरंच पोटभर अनुभवता येतं.
पण आमच्यातले बरेच जण या साऱ्या निसर्गचित्रमधे एकच गोष्ट शोधत होते ती म्हणजे, "नाश्ता..!!"
आणि तो मिळणार होता.. थंड पाण्याच्या विहिरी समोर.. आता कळसूबाईला जाऊन आलेला पूर्ण ग्रुप मध्ये मी एकटाच होतो आणि मला पूर्ण कल्पना होती की थंड पाण्याची विहीर यायला कमीत कमी अडीच ते तीन तास लागणार.. पण मग अस थेट सांगितलं तर त्यांचा उत्साह मावळेल न.. म्हणून मग मी जमेल तेवढा चेहरा निर्विकार ठेऊन सांगायचो.. "बस्स पाच मिनिटं चाललं की विहीर येईल.." पाच मिनिटं संपली की अजून कोणीतरी विचारायचं.. मग मी अजून "पाच मिनिटं" सांगायचो.. अर्धा तास झालं की अजून "पाच मिनिटं".. हळूहळू पब्लिकचा माझ्या "पाच मिनटांवरच" विश्वास उडायचा.. पण मग नन्तर खरच पाच मिनिटात विहीर यायची.. दगडी विहिरीचं थंडगार पाणी हातावर पडलं की ट्रकचा सारा शीण कुठच्या कुठं पळून जायचा. आणि मग पब्लिकच ''निसर्ग चित्र'' पूर्ण व्हायचं.. तेही भरपेट नाश्त्या सोबत..!!



दगडी विहिरीपासून कळसुबाई शिखर अगदी 20 मिनिटांवर आहे.. एक लांबलचक लोखंडी शिडी पार करून आणि आम्ही शिखर सर केलं.. आजू बाजूचा परिसर पाहण्याधीच आपसूक तोंडातून घोषणा उमटली.. "छत्रपती शिवाजी महाराज की.. जययय.." "जय भवानी.. जय शिवाजी" "हर हर.. महादेव.."..

या खरतर फक्त घोषणा नाहीतच मुळी.. ही एक प्रकारची जादू आहे.. वेगवेगळ्या ग्रुप्सना एका सुरात बांधणारी जादू.. थिल्लर पणा अलगद बाजूला सारून तुम्हाला नम्र करणारी जादू.. आणि थकवा शीण पळवुन अंगात चैतन्य आणणारी जादू.. शिवजादू..!!

सगळे वीस जण व्यवस्थित शिखरावर पोहचले तेव्हा.. एकेकाची बॅग मोकळी झाली.. ठेपला, चपाती, चिवडा, काकडी, साधी चकली, शेजवान चकली, चिप्स, बटाटा वेफर्स, केळा वेफर्स, जॅम, ब्रेड, बिस्किट्स, केक्स, चॉकलेट.. बापरे बाप.. इतके सारे पदार्थ बघुन (आणि खाऊन) आत्मा तृप्त झाला.. थोडावेळ आळसुबाई आणि मग कळसुबाई करून आम्ही शिखर उतरायला सुरुवात केली.. हो, त्याआधी भारतीय तिरंग्या सोबत एक ग्रुप फोटो ही काढला.. खर तर संपूर्ण ट्रेक मधला हा अतिशय आनंदाचा आणि अंगावर काटा आणणारा क्षण होता..

पुढे मग प्रत्येकजण आपापल्या वेगाने खाली उतरला.. त्यात कुणी चालत होतं.. कुणी पळत होतं, कुणी हातात हात घेऊन एकमेकांना आधार देत होतं, कुणी काठीचा आधार घेत होतं.. तर कुणी थेट खाली बसून घसरत घसरत खाली जात होतं.. प्रत्येकाची उतरण्याची पद्धत वेगळी होती.. तशीच  चढण्याची पद्धत ही वेगवेगळी होती..
पण आनंद मात्र एकच होता..
महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर 'कळसुबाई' सर केल्याचा..
















Comments

  1. खरंच एकदम भन्नाट आणि सुखद अनुभव होता हा, चढताना उतरताना दमछाक झाली पण मजाही 😇 आली काही माकड 🐒 टोळ्यांनी उड्या मारून आम्हाला खिंडीत गाठलं सुद्धा पण आम्ही धैर्याने सामोरे गेलो म्हणून काही त्रास नाही झाला आणि त्यावेळेस उमगले गनिमी कावा काय असतो ते आणि हो! काही वानरे हळू हळू सरपटताना ही बघितली 🤣 पण तरीही त्यांचा speed आमच्यापेक्षा जास्त होता 😅🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Hahahaha 😊 तुम्ही सारे होतात म्हणून मजा आली..

      Delete
  2. परत एकदा कळसुबाईचा ट्रेक करतोय असं feel करतौय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts