ग्रीनझोन
थांबा, थांबा..!! कृपया, पोस्टचं नाव वाचून कुणीही मला माझा पत्ता विचारू नका. कारण, मी काही "तसल्या" ग्रीनझोन बद्दल बोलत नाहीये (खरंतर, "तसला" ग्रीनझोन सध्या अस्तित्वातच नाहीये). आता सगळीकडे लालेलाल झोन्स आहेत..(आणि हो ती आपली अनलॉकची प्रक्रिया ही सुरू झाली आहे..)
असो, मी बोलत आहे खऱ्याखुऱ्या, सळसळणाऱ्या, पावसाने मस्त बहरून आलेल्या, हिरव्यागार "ग्रीनझोन" बद्दल..!
खरंतर, गेले कित्येक दिवस, आठवडे, महिने चार भिंतींमध्ये गेले असल्यामुळे.. आणि मुख्य म्हणजे ओला ओला गार पावसाळा बिनाट्रेकचा गेल्यामुळे.. 2020 हे वर्ष बंडल आहे यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. पण वर्ष कितीही बंडल असलं तरी आपण 'थंडल' बसता कामा नये. आणि म्हणूनच जवळजवळ सहा महिन्यांनी आणि 'ऊटी ट्रिप' नतंर पहिल्यांदा ग्रीन झोन मध्ये जायचं ठरवलं.
खरतरं, गेले बरेच दिवस पावलं आणि मन शिवशिवत होतच. शेवटी शिवशिवणाऱ्या मनाच्या आणि पावलांच्या मदतीला "ती'' धावून आली."ती" - गेले सहा महिने मी 'जिला' आणि 'जी' मला मिस करत होती, अर्थात माझं पाहिलं प्रेम.. माझी 'सुशो' (सायकल)..!! खरंतर मनात किंचित शंका होती.. 'सुशो माझ्यावर रुसली तर नसेल न ?', 'खूप दिवस कोंडून ठेवलं म्हणून रागावली तर नसेल न?', आणि मुख्य म्हणजे 'तिची तब्यत तर ठीक असेल न?' असे अनेक विचार डोक्यात होते.. पण तिला घराबाहेर काढलं.. थोडीशी "हवा" दिली, थोडासा Black-Tea (ऑइल) दिला आणि 'ती' चक्क तुरुतुरु धावायला लागली..!! हाय रे मेरी जान..!! याला म्हणतात फिटनेस.. हिच्यासमोर घुरर-घुरर करणाऱ्या, पेट्रोल-पिणाऱ्या सगळ्या बेवड्या पऱ्या फेल आहेत... क-म्मा-ल..
सुशोने तर आपला फिटनेस दाखवून दिला, आता प्रश्न होता माझ्या फिटनेसचा. कारण, 'सहा महिने घरात बसून वस्तुमान आणि क्षेत्रफळ वाढलं तर नसेल न ?', आणि 'जर वाढलं असेल तर त्या वास्तुमानासहित सुशोसोबत लांब फिरता येईल का?'.. असे बरेच (वजनदार) प्रश्न डोक्यात होते. पण म्हटलं.. जे होईल ते होईल.. सुशो सोबत आहे तर टेन्शन घ्यायाची काही गरज नाही. पण मग आता पुढचा प्रश्न उरला तो म्हणजे जायचं तर जायचं कुठे ? तो ही सुटला.. आणि एक मस्त बेत ठरला. ठाणे ते कल्याण सायकलिंग, आणि पुढे मग मित्रासोबत त्याचा बाईक वर माळशेज भ्रमंती..(ग्रीनझोन).
कल्याण म्हणजे तसा काही मोठा पल्ला नाही.. म्हणून खूप सकाळी वगैरे न निघता आरामात दुपारी निघालो(आणि तिथेच माती खाल्ली). कारण, पल्ला मोठा नसला तरी कल्याणला जाणार हायवे विचित्र होता.. आणि ती आपली अनलॉक ची प्रक्रिया वगैरे सुरू झाली असल्याने हायवेला गंदू ट्राफिक होत. त्यात भर म्हणून की काय ऊन देखील फुल फॉरमात होतं. निघताना 4 वर असलेला गियर मग कधी 2 वर आला कळलंच नाही. अश्या किचकट अवस्थेत साथ होती फक्त सुशोची आणि हायवेच्या बाजूला अधून मधून भेटणाऱ्या सर्व्हिस रोडची. कारण, मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स मधून जाणारा सर्व्हिस रोड हायवेच्या बाजूला असूनही एकदम निवांत होता. बऱ्याचदा पूर्ण रोडवर दुरदूरपर्यंत कुणीच नसायचं. अशा वेळी मात्र एखादं गाणं गुणगुणत सारा सफर सुहाना झाला. कसलीही घाई न करता संध्याकाळी कल्याण गाठलं. आणि 'रात्र' "प्रकाश"च्या घरी काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच आम्ही कल्याण सोडलं. बदलापूर पर्यंत 'रोड' होता पुढे 'रस्ता' झाला आणि बारवी धरणाच्या हिरवळीने रस्ता 'फिरस्ता' झाला. दोन्ही बाजूने जेव्हा हिरवं खरंखुरं जंगल लागलं तेव्हा हळूच मास्क खाली केला आणि एक खोल श्वास घेतला.. हिरररवा..!! आणि गेल्या सहा महिन्यात कोंडलेला श्वास मोकळा झाला. त्यापुढच्या पूर्ण प्रवास खरच एखाद्या ग्रीन-ट्रीटमेंट सारखा होता. कोंडलेल्या, अडकलेल्या, मिटलेल्या मनावर झालेली "हिरवीगार" lifesaving ट्रीटमेंट..!!
आणि खरंच या प्रवासात साध्या गोष्टी ही सुरेख दिसत होत्या, भासत होत्या..
-- कुठेतरी मधेच हाणलेला तिखट मिसळपाव जणू डोळ्यांसाठी आणि जिभेसाठी उत्सव होता..
-- बारवी धरणातून पडणार पाणी आणि त्याचा आवाज जणू जिवंतपणाची गाज होतं..
-- रस्त्यावर लागणारी वळणं जणू एखाद्या सुरेल गाण्यातल्या हरकती होत्या..
-- नदीतुन शांत वाहणार पाणी जणू पांढऱ्या ढगांचा, हक्काचा आरसा होता..
-- रस्त्यात मधेच भेटलेला म्हशींचा कळप तर एकदम खानदानी, शेहनशाही सवारी होती..
प्रवासात, माळशेजमध्ये जागोजागी पोलीस बंदोबस्त असल्याने कुठे खास थांबता नाही आलं. पण मध्ये एका (आडवाटेवरच्या) बंधाऱ्यावर थांबून मनमुराद भिजून घेतलं. आणि शब्दशः अंतर्बाह्य फ्रेश झालो..
परत येताना प्रकाश आणि मी, आम्ही दोघेही शांत होतो.. संपूर्ण ग्रीनझोन अनुभवल्यावर मनात विचार आला "खरच, काय विलक्षण आहे निसर्ग...
तुम्ही त्याच्याकडे बघा अथवा बघू नका, तो आपला मनापासून बहरत असतोच.. आणि तो बघणारा प्रत्येक जण त्यात 'हरवत' असतोच.."
... तसाच मी ही काही क्षण त्यात 'हरवलो' आणि पुन्हा एकदा स्वतःला नव्याने सापडलो...
सुक्कून.............👍
ReplyDeleteThank you buddy :-)
Deleteमस्त ..आमची पण मानस फिरस्ती झाली !
ReplyDeleteThank you :-)
Deleteआनंद....आनंद देऊन गेला तुझा ग्रीन झोन!!!
ReplyDeleteThank you buddy :-)
DeleteGreen green zone
ReplyDeleteThank you :-)
Deleteएकदम झक्कास अनुभव. पाणी हे पांढऱ्या ढगांचा हक्काचा आरसा एकदम भारी. लगे रहो आनंद.
ReplyDeleteThankuu😊
DeleteAwesome bhai...full..हिरवेगार वाटतय.
ReplyDeleteDhanyawad deva
DeleteKhup sundar! Felt the greenery and beauty around after reading your piece!
ReplyDeleteThankyuu 😊
Delete🌿🍃 👍
ReplyDelete