आई'ज हेयर कट कट
लॉकडाऊन सुरु झालं तेव्हा नेमका मी गावी होतो. त्यामुळे कोरोना वगैरेशी माझा संबंध फक्त बतम्यांपुरताच होता. गावी मी तसा अगदी मस्त आणि मुक्त होतो.. म्हणजे दिवसभर इकडं तिकडं हुंदाडनं.. पोहायला जाणं.. मजबूत खाणं.. मजबूत झोपणं वगैरे वगैरे आणि वगैरे.. पण, या माझ्या सुखी जीवनावर एकदा माझ्या 'आईची नजर' पडली आणि होत्याच नव्हतं झालं.. त्याच झालं असं की, माझे गरीब बिचारे केस एकदा आईच्या नजरेत भरले.. आणि दिवस-रात्र त्यांच्या नावाचा उद्धार सुरु झाला..
सकाळी उठलो की आई म्हणायची "केस काप..",
नाश्ता करताना "केस काप..",
बाहेर जाताना "केस काप.."
आणि घरी आलो की "केस काप.."
(नुस्ता तापच ताप)
बरं, कुणाला वाटेल की त्यात काय एवढं आई म्हणतेय तर कापायचे ना केस...
पण, मुद्दा हा होता की लॉकडाऊन असल्याने सगळे न्हावी बंद होते. आणि केस कसे कापायचे हा मुख्य प्रश्न होता.. त्यामुळे माझा केस कापण्याला अगदी ठाम नकार होता.
अखेर माझ्या आईने मग गनिमी कावा केला. दोन दिवस ती मला केसांबद्दल काहीच बोलली नाही. आणि तिसऱ्या दिवशी मामा कैची-कंगवा घेऊन माझ्या समोर बसला. आता पळून जायला काहीच जागा नव्हती. एका बाजूला आई होती आणि दुसऱ्या बाजूला मामा.
मग काय मी गप-गुमान "सरंडर" केलं आणि मान खाली घालुन मामा समोर बसलो.
पण, अहो "आश्चर्य" मामाने माझे केस अगदी फर्स्ट-क्लास कापले. अगदी न्हाव्याने कापावेत तसे. मला तर जाम भारी वाटलं. आणि मुख्य म्हणजे आई शांत झाली आणि माझ्या सुखी जीवनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली....
त्यांनंतर,
थेट आज पुन्हा तोच प्रकार घडला.
सकाळी अंघोळ करून बाहेर आलो आणि आईची नजर पुन्हा एकदा माझ्या केसांवर पडली. आणि केसांच्या नावाने उद्धार चालू झाला. गावी होतो तेव्हा मामा तरी होता. इथं घरी आल्यावर केस कापायचा एकच पर्याय होता तो म्हणजे आई..
आईला शरण जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मी दुपारभर खूप विचार केला. मग, मनात म्हटलं मामाने तर केस अतिशय छान कापले होते. आणि तस पाहता आई म्हणजे मनाची सख्खी बहीण. त्यामुळे मामाची सख्खी बहीण म्हणजेच आई देखील थोडेफार का असेना पण चांगले केस कापेल.
अखेर भीत भीतीच आईला माझा होकार कळवला..
मग, संध्याकाळी कैची, कंगवा, शेविंग मशीन घेऊन आई समोरच बसली. (या सगळ्यात तिने आरसा मात्र घेतला नव्हता..!!).
आईने आधी केस नीट विंचरले अगदी लहानपणी मी शाळेला जाताना विंचरायची तसे.. पण..
पण.. त्यांनतर मात्र घात झाला.
आईने पहिलाच वार केला तो माझ्या कपाळावरच्या केसांवर केला. खरतरं, आजवरचा माझा केस कापण्याचा अनुभव असा आहे की, सुरुवातीला बाजूचे, कानावरचे, मागचे केस कापले जातात आणि शेवटी पुढचे केस कापले जातात. पण आईने याच्या अगदी उलटा कार्यक्रम केला होता. तसा हा वार अगदीच अनपेक्षित होता. अगदी एका क्षणात "खाच" असा आवाज झाला आणि माझ्या पुढच्या केसांचा बुचका माझ्या नाकावरून घसरून मांडीवर पडला. हा आईने केलेला पहिला वार खरतरं पुढे होणाऱ्या युद्धाची नांदीच ठरली. पुढच्या दोनच मिनिटात मला स्पष्टपणे जाणवलं की केस कापणारी व्यक्ती हि माझी आई नसून माझ्या केसांचा शत्रूपक्ष आहे. कारण, आजवर मी नेहमीच आईने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त केस ठेवत आलो आहे. पण, आज मात्र आईने बरोबर संधी साधली होती. कुठेतरी आईचा हा डाव हाणून पाडावा म्हणून मी आईला एक युक्ती सुचवली. मी आईला म्हटलं, "आई, कैची आणि कंगवा दोन्ही चालवून तुझे हात दुखतील गं, त्यापेक्षा हि शेविंग मशीन घे. यात कैची आणि कंगवा दोन्ही फिक्स आहे. तुझं काम सोप्प होईल..!" आणि कसं कुणास ठाऊक आईला ही युक्ती पटली. तिने कैची बाजूला ठेवून माझ्या डोक्यावर शेविंग मशीन फिरवायला सुरुवात केली. त्या मशीन च्या वायब्रशनने माझ्या डोक्यात नुसतं विचारांचं मोहळ उठलं होतं. पण, एक गोष्ट निश्चित होती, ती म्हणजे मी मशीनला सगळ्यात मोठा कंगवा लावल्यामुळे माझं टक्कल होणं अशक्य होतं. काही वेळ "घररर घररर" केल्यावर मी आईला आरसा मागून घेतला. आरश्यात एक नजर मारली आणि डोक्यावर हात मारून घेतला. (हो, डोक्यावरच..!! कारण, आईने पुढची केस पार साफ करून टाकली होती)
तिने पहिला जोरदार हल्ला पुढच्या केसांवर करून पुढचं मैदान अगदी साफ करून टाकलं होतं. आणि बाकी केस जशास तसे ठेवले होते. आता माझा "हा असा" अवतार पाहून मला काही क्षण काहीच सुचेना. एकदा उगाच वाटलं की डोळ्यातून पाणी येतंय. (पण, आई केसांवर पाणी शिंपडत होती, आणि ते डोळ्यात जात होतं). आता पुढचे केस सपाटे झाले होते त्यामुळे मागच्या केसात देखील काही आनंद उरला नव्हता. आईने मग हळू हळू तेही उडवून टाकले. प्रत्येक क्षणाला केसांचा एक-एक बुचका माझ्या मांडीवर पडत होता. आणि माझ्याकडे बघून ढसाढसा रडत होता. काही वेळातच आजवर मी डोक्यावर अगदी मानाने मिरवलले माझे प्रिय केस घराच्या युद्धभूमीवर धारातीर्थी पडले होते. आणि उरलेले केस अगदी जीव मुठीत घेऊन डोक्यावर दबा धरून बसले होते.
शेवटी, अर्धा तासाने सारी हत्यारं म्यानबंद झाली आणि आई बाजूला झाली. आईने समोर येऊन एकदा माझ्याकडे पाहिलं आणि "खी खी खी खी" हसत सुटली. आणि नन्तर म्हणाली.."एक्दम मोकळं मोकळं वाटत असल ना आता ? किती कचरा झाला होता डोक्यावर.." ती एवढं बोलते न बोलते तोच मी आईला तिथून गुपचूप निघायला सांगितलं.
मी रागाने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि हळूच आरश्यापुढं गेलो. आणि आईने केलेला परक्रम जरा जवळून पाहू लागलो. (खरतरं आता तो पाहण्याखेरीज माझ्या हातात काही काही उरलं नव्हतं.)
जरा निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या आईने माझ्या केसांचा एकदम नागराज मंजुळे कम नाना पाटेकर कट करून टाकला होता.. थोडा थोडा सैराट आणि थोडा थोडा क्रांतिवीर...
आपलाच,
केस(रहित)आनंद
Superb...
ReplyDeleteMast ch.... without editing photo pathav
ReplyDeleteNko nko.. garib ki izzat ka sawal hai.
DeleteAbhi toh meri shadi bhi nhi hui
Best line was.. केसांचा एकदम नागराज मंजुळे कम नाना पाटेकर कट करून टाकला होता.. थोडा थोडा सैराट आणि थोडा थोडा क्रांतिवीर...hahahahahaha 😀👨🦲👨🦲👨🦲👨🦲👨🦲
ReplyDeleteDhanyawad ☺️
Deleteआपलीच शेती आनंदराव कधीबी वाढतीय
ReplyDeleteखरं आहे देवा.. ☺️
DeleteReally true, in lockdown same happend with my younger brothers
ReplyDeleteIts a universal disaster @meriudaan ☺️
Deleteमस्त लिहिलंय आनंद!
ReplyDeleteDhanyavad Deva
DeleteMast disatoy hair cut pic madhe
ReplyDeleteThankyuuuu Unknown ☺️
DeleteNagraj manjule cum Nana Patekar cut 🤣🤣👌👍
ReplyDeleteDhanyawad Deva ☺️
Deleteआईने चालेल का, विचारलं तर असं हो म्हणायचं नसतं लगेच. असो. हा पहिला धडा लक्षात ठेव. केसांवर वाचला आहेस. दुसऱ्या कशाला हां म्हणाला असतास तर केस हाताबाहेर गेली असती😊
ReplyDeleteHahaha धन्यवाद Unknown.
Deleteखरं आहे.. यातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे जरा जपूनच रहायला हवं