विलक्षण पान..
आज 'एक' ट्रेक केला. पाचव्यांदा...
ट्रेक, वाट, परिसर, डोंगर सारं काही ओळखीचं होतं. मात्र पायवाटेवर असलेला पानांचा सडा मात्र माझ्यासाठी नवा होता. पायवाटेवर जवळ जवळ अब्जावधी पानांचा खच पडला होता..
वेगवेगळी पानं.. प्रत्येक पानाचा आकार, प्रकार आणि रंग अतिशय भिन्न पण विलक्षण होता.
डोक्यात विचार आला की हे प्रत्येक पान म्हणजे एक आयुष्यच आहे की.. त्याचाही कधी तरी जन्म झाला असेल, त्याच्या झाडाने त्यालाही अंगाखांद्यावर वाढवलं असेल, वाऱ्याने त्याला खेळवलं असेल, त्यानेही बालपणाचा पोपटी कोवळा लुसलुशीतपणा अनुभवला असेल, कधीतरी ते हि तरुण गडद गार हिरवं झालं असेल, आणि आता.. कदाचित काही दिवसांपूर्वी तेही पिवळी धम्मक म्हातारं झालं असलं.
आज मात्र त्याच पानाचा झाडाखाली 'पाचोळा' झाला आहे. कदाचित लहानपणी खेळवणारी अल्लड वाऱ्याची ती झुळूक आज ही आली असेल.. आणि पिवळ्या जर्जर झालेल्या पानाला झाडापासून अलगद वेगळं करून गेली असेल. आणि पानासाठी झाडापासून वेगळं होणं म्हणजे साक्षात मरण..मृत्यू..!!
पण, त्या प्रत्येक पानाकडे पाहिल्यावर जाणवतं कि त्यांनी त्याच्या मरणाचा देखील सोहळा साजरा केला आहे. कारण, मरतानाही प्रत्येकाने काय अप्रतीम रंग ल्याले आहेत, अंगांअंगावर काय नक्षी रेखली आहे.. त्याचं मुडपन्-दुमडनं तर एखाद्या लावण्यावतीने नाक मुरडावं अस्सच आहे.
निव्वळ अप्रतिम..!!
या धारातीर्थी खच झालेल्या लक्षावधी पानांकडे कदाचित कुणी बघणारही नाही.. कुणी त्यांना उचलून घेणार नाही, कुणी त्यांना जपून ठेवणार नाही, कुणी त्यांचं नाव घेणार नाही का कुणी त्यांच्यासाठी दोन थेंब अश्रू गाळणार नाही.. पण त्यांना मात्र त्याच कसलंच सोयरसुतक नाहीयं..
कारण, त्यांनी आपलं जगणं आणि मरण देखील सुखांत केलंय..
कायमचं..!!
आनंद, एकदम सुंदर. अप्रतिम. आता पर्यंतचा सर्वोत्कृष्ट लेख.
ReplyDeleteThank You Sir..!! ☺️
Deleteआनंद, पाचोळ्यावरही इतकं सुंदर लिहिता येऊ शकतं! पाचोळ्याचं प्रतिक घेऊन जीवनाकडे बघण्याचा किती सकारात्मक विचार! तुझा लेख वाचताना एक खूप जुनं गाणं आठवलं. "पाचोळे आम्ही हो पाचोळे"
ReplyDeleteThank You.☺️
Delete