घुसमट आणि श्वास.....



उघडता डोळे घड्याळ दिसते
क्रूर बिलंदर टिक-टिक हसते,
हसता हसता टोचीत काटे
हळूच मानगुटीवर बसते..

मानगुटीवर बसूनि ते
डोक्यामध्ये भरते वेग,
जीव बिचारा दमून जातो
धावत राहते 'लोकल' रेघ..

रेघेची मग रांग होते
रांगेमध्ये येतो ताण,
चढतो दिवस जसा जसा
करपत जाते हिरवे रान..

रानवर मग यंत्रे फिरती
जीव बिचारा होई गुलाम,
आठ तास - नऊ तास
संपत नाही यांत्रिक काम..

यंत्र क्रूर थकतच नाही
मन मात्र शिणते फार,
टोचणाऱ्या काट्यांनाही
हळू हळू मग चढते धार..

धार धारसे वार झेलत
मुकाट करतो सारे सहन,
का करतो ?
कशासाठी ?
प्रश्न उरतो फक्त..गहन..

प्रश्नांचे गाठोडे घेऊन
पुन्हा धावे लोकल 'रेघ',
श्वास वेडा सांडून जातो 
शरीर घेई पुन्हा वेग..

क्षणभर शांत डोळे मिटता
स्वप्नातच मग धावत सुटतो,
घड्याळ काटे, लोकल रेघ
सारी सारी गणिते पुसतो..

धावत चढतो किल्ले डोंगर
होतो वाऱ्यावरती स्वार,
निमूट एकटा भटकत राहतो
फेकून सारा उसना भार..

फेकून देतो, घड्याळ काटे
फेकून देतो, चिंता..फास
सुर्यास्ताला नजर रोखून
छातीत भरतो..हिरवे..श्वास..!!


#keepbreathing 
#keeptraveling


Comments

  1. वाह, किती छान लिहिलं आहे, अफलातून, एकदम जबरदस्त

    ReplyDelete
  2. तुझे शब्द इतके सामर्थ्यवान आहेत की कविता वाचताना तू घेतलेले अनुभव अगदी आपलेच आहेत असा भाव तयार होतो....आणि कवितेतील लिंक जुळवण्याच कौशल्य खरच वाखण्याजोगे आहे...

    धन्यवाद दादा अशा अप्रतिम लिखाणा बद्दल ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts