Roadtrip...!!


"Journey doesn't mean only kilometres or miles, it's all about memories n smiles..."    - Anand Sapate

...आणि Roadtrip हा एक असाच प्रवास होता.. किलोमीटर, काळ, वेळ यांच्या पल्याडचा..!!

खरंच खरतरं, Roadtrip करण्याचा ना काही विचार होता ना काही नियोजन. पण सहज योगायोग जुळून आला आणि मार्ग मिळून गेला. या रोड-फिरस्तीला निमित्त होत Office च्या कामानिमित्त शहापूर व मुरबाड तालुक्यातील काही आश्रम शाळांना भेटी देण्याचं. (धन्यवाद ऑफिसराव.!) मग हेच निमित्त साधून ऑफिसच्या गाडीसोबत चार दिवस पोटभर फिरलो. त्यात काम तर झालंच पण दररोज ठाण्यापासून एखाद्या दूरच्या गावापर्यंत मनमुराद भटकताही आलं.

संपूर्ण प्रवासात सोबत ऑफिसची काही दर्दी मंडळी होती.. नव्या-जुन्या हिंदी गाण्याची बरसात होती आणि होती मनस्वी पावसाची सोबत..!!
पाऊस्स्स्स्सस्स्स..
कधी गुपचूप दडून बसणार.. कधी गडगडून हसणारा.. कधी गाडीच्या काचेवरुन टीपटीप ओघळणारा.. तर कधी 'आला आला' म्हणता वाऱ्यातच विरघळणारा.. 
रोडवर.. झाडांवर..शेतावर..घरांच्या कौलावर..
डोंगरावर.. गाडीच्या काचेवर आणि काच उघडली कि थेट आपल्या गालावर.. 
अलवार..अलगद..चैतन्य ओतनारा "पाऊस...!!
अशी चिंब सोबत असताना करता आलेली रोडट्रीप हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
तस पाहता दौरा साधाच होता.. कधी शहापूर तर कधी मुरबाडचा.. पण पावसाने निसर्गावर अशी काही जादू केली की साधा दौराही खास झाला. प्रवासात आश्रम शाळेचा पत्ता शोधताना बऱ्याचदा गावाचं फक्त नाव हातात असायचं. आणि असायचा खुनावणार अनोळखी  रस्ता..
पण, तो रास्तच इतका सुंदर असायचा की आम्ही काही क्षण कुठे जायचंय तेच नेमकं विसरून जायचो. त्यात बऱ्याचदा मोबाईलचं नेटवर्क मनापासून गायब व्हायचं. त्यामुळे अगदी आनंदी आनंदच..!
सरळ सरळ तर कधी सरळ वळणं घेणाऱ्या रस्त्यात कधी कधी एकही गाव किंवा गावाच्या नावाची साधी पाटीही दिसायची नाही. गाव नाही त्यामुळे वस्ती नाही.. वस्ती नाही त्यामुळे माणसं नाहीत.. आणि माणसं नाहीत तर पत्ता विचारायचा प्रश्नच नाही. अधूनमधून दूरवर माळावर मोकाट गुरं मात्र चरत असायची.. आणि आमची गाडी पास होताना नुस्ती टकमक बघत बसायची. अशावेळी "नसती काळजी" गाडीच्या मागील डिक्कीत बंद करून आम्ही मात्र आजूबाजूची मस्त हिरवाई अनुभवायचो. त्या हिरावाईत बऱ्याचदा झोडपू लागलेला पाऊस होता.. इकडून तिकडून उड्या मारत धावणारं शुभ्र सफ्फेद पाणी होतं.. हिरवीकंच होऊन नाचू लागलेली झाडे होती आणि ढगांच्या शुभ्र शाली पांघरणारे डोंगरही होते.. हिरवटचिंब..

अखेर रमत गमत जेव्हा आम्ही एखाद्या शाळेत पोहचायचो.. तेव्हा तिथले मुख्याध्यापक आपुलकीने चौकशी करायचे.. "शाळा शोधताना काही अडचण तर नाही न आली ?"
उत्तरादाखल आम्ही फक्त हसायचो.. आणि "Thank You" म्हणायचो..
(हे Thank You असायचं त्या लांब दुर्गम भागात असलेल्या शाळेसाठी, आम्हाला तिथवर पोहचवणाऱ्या रस्त्यासाठी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंथरलेल्या हिरवळीसाठी, अधूनमधून भेटणाऱ्या डोंगरांसाठी.. आणि या साऱ्यात चैतन्य ओतणाऱ्या पावसासाठी...)

खरंच, या चार दिवसाच्या ओल्या Roadtrip ने कितीतरी दिवस मनावर साचलेली धूळ पार धुवून गेली. आणि मन अगदी नवीन पालवी फुटलेल्या पानासारखं टवटवीत झालं.
पुन्हा पुढच्या फि र स्ती सा ठी . . .

Thank You Shubhangi, Ishita & Nandini,
For your wonderful company..!!

Thank You Pausss..!!










Tag Cloud
Roadtrip
Firasti
Gypsysoul
Traveler
Raintravel




Comments

  1. नेटवर्क मनापासून गायब व्हायचं. हे आवडलं. एकदम मनापासून.

    ReplyDelete
  2. अप्रतिम वर्णन फिरस्ति

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts