पहिलं प्रेम (भाग -२ ) / First Love (Part - 2 )


पहिलं प्रेम..!!
खरंतर, "प्रेम म्हणजे काय ?" हे माहित ही नव्हतं, तेव्हापासून "ती" आजूबाजूला होती. शाळेत असताना बऱ्याचदा "ती" दिसायची..."कधी पावसात भिजताना, कधी भिरभिर फिरताना, कधी शांत उभा असलेली तर कधी कधी रस्त्यात रुसून बसलेली... अल्लड, बेफिकीर आणि मनस्वी..!"
तसं नाही म्हणायला तिची-माझी मोजकीच तोंडओळख होती. म्हणजे मी तिला नावाने ओळखायचो. आणि कदाचित ती ही मला ओळखत असावी. पण तिने तसं कधीच दाखवून नाही दिलं. मीही कधी तिला भेटायचा प्रयत्न नाही केला.
मग माझी दहावी झाली आणि एकदम माझी अल्लड शाळा संपली आणि संपली आमची अधून मधून होणारी नजरानजरही..

त्यांनतर मी नव्या रंगीबेरंगी कॉलेजच्या दुनियेत प्रवेश केला. नवी दुनिया, नवे रंग आणि नवं आयुष्य..!!
मग जवळ जवळ दोन ते तीन वर्षे ना "ती" कधी मला भेटली ना मी कधी तिला भेटलो. दिवस छानच चालले होते.. आजूबाजूची मित्रमंडळी extra curricular activities (प्रेम, मारामारी, लफडी वगैरे वगैरे) करण्यात दंग होती. आणि मी मात्र NSS चा फॉर्म भरून बसलो होतो. त्यामुळे अर्धा दिवस (इमानदारीत) सगळे लेक्चर्स बसायचे आणि मग अर्धा दिवस NSS ऑफिसमध्ये बसायचं. (मग extra curricular activities करायला वेळ मिळणार तरी कसा..???)
सारं कसं सरळ सरळ सीधा सीधा चाललं होतं.  आणि तितक्यात आयुष्यात "ती" ची एंट्री झाली. त्याचं झालं असं, की मी एकदा सहज दीदी सोबत चालत होतो.. आणि जोरात पावसाची सर आली..  छत्री एकच होती त्यामुळे दोघेही जवळजवळ भिजलोच.. पण त्या भर पावसात दीदी ने "ती"चा विषय काढला.. आणि मग पुढचा अर्धा तास दीदी तिच्याबद्दल बोलत राहिली आणि मी ऐकत राहिलो. पुढे दीदी निघून गेली, पाऊसही निघून गेला.. पण... "ती' मनात भरली ती कायमचीच....

वयाच्या ऐन विशीत.. भर पावसात मला 'ती' खूप नवी नवीशी आणि हवी हवीशी भासली.. मग मनोमन ठरवूनच टाकलं कि काही झालं तरी आता तिला भेटायचंच. मग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला एका भल्या दिवशी मी तिला भेटलो.. ती मला भेटली.. आणि पहिल्याच भेटीत आम्ही दोघही एकमेकांच्या प्रेमात पडलो..! सुरुवाती-सुरुवातीला आम्ही कुणी नसेल अश्या रस्त्यावर लपून छपून भेटायचो..
आमचं नव नव प्रेम कुणी बघू नये म्हणून फार जपायचो. पण मग जसजसे दिवस जात गेले तशी माझी भीडही चेपत गेली.. आणि मी दिवसाढवळ्या तिच्यासोबत फिरायला लागलो..
ती तर आधीपासूनच बिनधास्त होती मग मीही बिनधास्त झालो. त्यात बऱ्याचदा "ती" मला सोडायला आणि घ्यायला कॉलेजला यायची. मग कॉलेज सुटल्यावर आम्ही उगाच इकडं तिकडं हिंडत बसायचो.. अगदी तासनतास एकमेकांसोबत असायचो.
कारण, तिच्या सोबत मला वेळेचं भानच राहत नसायचं.. आणि ती माझ्या सोबत बेभान व्हायची..!

त्यानंतर मात्र आम्ही कधीच मागे वळून पाहिलं नाही. "लोक काय म्हणतात, मित्र काय म्हणतात, घरचे ओरडतिल असल्या क्षुल्लक गोष्टींचा तर विचार आम्ही कधीच केला नाही. आम्ही केलं फक्त प्रेम.. एकमेकांवर.. मनापासून..!!

आणि मग एकेदिवशी...
तिला सरळ घरीच घेऊन गेलो.. दारात गेलो आणि आईला आवाज दिला, "आईईई...!!"
आई हातातलं काम टाकून पटकन बाहेर आली. बाहेर येऊन बघते तर काय.. मी आणि "ती" हातात हात घेऊन एकमेकांना खेटून उभे होतो. तशी आईला आमच्या प्रकरणाची उडती उडती खबर होतीच पण मी तिला घरी-बिरी घेऊन येईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. पण मी मनात म्हटलं, 'प्यार किया तो डरना क्या ? जो होगा देखा जायेगा..'
"ती"ने दारातूनच आईला नमस्कार केला.
आणि मी आईला "ती"ची ओळख करून दिली, "आईईई.. ही सायकल..!! आणि आजपासून हि अपल्यासोबतच राहील..!!"


For reading "first part" click on the below link
https://www.firasti.in/2019/06/1-first-love-part-1.html


Tag Cloud
Firasti
FirastiFirstLove
FIRSTLOVE
Gypsylove

Comments

Post a Comment

Popular Posts