पहिलं प्रेम (भाग -1) First Love (Part-1)



फिरण्याची आवड लहानपणापासूनच होती पण माझा स्वभाव काही 'फिरस्ती' नव्हता..
कारण लहानपणीच फिरणं म्हणजे अगदी..
"एसटी मध्ये बसून मामाच्या गावी जायचं.. जाताना खिडकीला चिकटून राहायचं.. प्रवासात कितीही रात्र झाली तरी अजिब्बात नाही झोपायचं..
आणि जाताना खंडाळ्या घाटाला डोळे भरून पहायचं..!!"
पण त्यातही तेव्हा 'यष्टी'चा प्रवास म्हणजे अफलातून प्रकार असायचा.. ती लालपिवळी मळखाऊ 'यष्टी' दिसताच 'ष्ट्यांड'वर  एकचं धम्माल धांदल उडायची. मग तिच्या पाटीवरच नाव वाचण्यासाठी बारक्या पोरांची चढाओढ लागायची. आणि सहावारी/नऊवारी साड्यांची मात्र पिशव्यांची आवराआवर चालायची. आणि त्यांनतर एसटी जवळ आल्यावर मोठी मंडळी टोप्या, पिशव्या, रुमाल टाकून "तत्काळ" रिसेर्वेशनस करायची ..! (अस  तत्काळ तिकीट बुक करणं मला अजून जमलेलं नाहीये)
मग मिळेल त्या जागेवर बसून सुरु व्हायचा अफलातून प्रवास....

ती खच्चून भरलेली एसटी, त्यातली ती फेटे-गांधी टोप्या घालून तंबाखू मळणारी मंडळी, त्या पिशव्या आणि पोरं सांभाळणाऱ्या बायका.. आणि काहीतरी अरबट चरबट खात खिडकीतून बाहेर बघणारी उत्साही म्हणजेच अमच्यासारखी शेम्बडी पोरं.. सगळी यष्टी म्हणजे जणू एक अफलातून नाटक कंपनीचं असायची. आणि त्या नाटक कंपनीचा दिग्दर्शक असायचा कण्डक्टर..!! त्याने दिलेल्या घंटीवर आणि आदेशावर प्रवासातले सारे अंक पार पडायचे. त्याने दिलेल्या घंटेवर ब्लॅकआउटसही व्हायचे आणि त्याने दिलेल्या घंटीवर लाईट्सही लागायचे.. सारा प्रवासच इतका जिवंत असायचा कि कुठल्याही कृत्रिम करमणुकीची गरज नसायची.

एसटीचा प्रवास संपल्यावर भेटायचा दणदणीत गाणी वाजवणारा (खच्चून भरलेला) टमटम..!! इथं मात्र सगळाच कसा one man show..! टमटम नावाच्या नाटक कंपनीचा सर्वेसर्वा (लेखक-दिगदर्शक-निर्माता) हा टमटम ड्राइवर असायचा. आणि या नाटकात तो इतकी कच्चून पात्र भरायचा की अक्खा "टमटम" नामक रंगमंच अपुरा पडायचा.. मग काही मंडळी चक्क theatre ला बाहेरून लटकायची.. आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुल करायची..!! या साऱ्या प्रयोगात आमच्या सारखी उत्साही म्हणजेच शेम्बडी पोरं मात्र कुठंतरी आईच्या मांडीवर किंवा मिळेल त्या सांदीत उभी राहत आणि आईच्या पदराला नाक पुसत सगळी गंमत अनुभवायची..

पुढे थोडं मोठं झाल्यावर मामा कडे मोटारसायकल आली, गावाला जायला AC sleeper गाडी चालू झाली.. पण ती यष्टीची आणि टमटमची गंमत अजून नाही विसरता आली. काही म्हणा पण या दोघांनीही मला प्रवासातलं 'फुकट' नाटक बघायला शिकवलं..

पण हे सगळं खरं असलं तरी मला प्रवासावर प्रेम करायला आणि 'फिरस्ती' व्हायला शिकवलं ते ''ती''नेचं..
मी फिरस्ती होण्यामागे बऱ्याच अंशी "ती"चा हाथ आहे.. "ती" भेटली आणि आयुष्य बदलून गेलं.. आणि खरं सांगायचं तर "ती"ची-माझी ओळख, मैत्री आणि प्रेम हेच माझ्या फिरस्ती होण्यामागच मुख्य कारण आहे..!
चला तर मग भेटूयात माझ्या पहिल्या प्रेमाला.. माझ्या "ती"ला.. (पण पुढच्या भागात..!!)

#KeepReadingKeepTraveling & KeepLoving
www.firasti.in




Comments

  1. नाटक = यष्टी 😍 कोण आहे कोण ती? 👌

    ReplyDelete
  2. मस्त आनंद...सगळे चित्रपटा प्रमाणे डोळ्या समोर आले...असाच लिहीत रहा...सर्व शुभेच्छा

    ReplyDelete
  3. Superbly expressed .
    Well written .
    तुझी 'ती' म्हणजे *सायकल*.
    बरोबर ना?

    ReplyDelete
  4. Ti mhnj fkt ani fkt tuzi cycle ahe .

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts