मैसूर डायरी (Day - 5) / Mysore Diary
आजही एकदम शिस्तीत उठलो आणि नाष्टा वगैरे करुन वेळेत बाहेर पडलो. आज चामुंडीनंतर दौऱ्यातली दुसरी मोठी ride होती. बरोबर 7.30 ला आम्ही सायकलिंग चालू केलं. मजल दरमजल करत आम्ही एक एक रस्ता माग टाकत तासाभरात आम्ही शहराबाहेर पडलो. "व्हेर उई आर गोइंग्ग ?" हा प्रश्न मी गाईड ला विचारला नव्हता. कारण, मला खरचं फक्त सायकलिंग मध्ये मजा येत होती. उंच सखल परिसर.. चढ उतारयुक्त रस्ते.. दोन्ही बाजूला गर्द हिरवी शेत आणि नारळाची झाडी.. प्रवासच खूप सुंदर वाटत होता. आणि सकाळ असल्यामुळे आम्ही किती सायकलिंग करतोय वगैरे काही जाणवत नव्हतं. साधारण 20km सायकलिंग केल्यावर आम्ही के.आर.एस. (कृष्ण-राज-सागर) धरणाच्या परिसरात एका मंदिरापाशी पोहचलो.
वेणूगोपालस्वामीमंदिर.
एखाद्या दक्षिण भारतीय चित्रपटाचा set असल्यासारखं हे मंदिर होतं. प्रशस्त, भव्य आणि चकचकीत. मला पहिल्यांदा मंदिरात जायची खूपच घाई झाली होती.(कारण बाहेर गरमी वाढली होती.. आणि मंदिरातल्या थंडगार फरशीवर आरामात पाठ टेकायची होती). पण, या मंदिराच्या आत बसण्यास आणि फोटो काढण्यास मनाई होती. आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला खरच आत जायची इच्छा होत नव्हती. पण म्हटलं 'आता इतकी तंगडतोड केलीय तर जाऊन तर येऊ'. मंदिर अतिशय स्वच्छ आणि रेखीव होतं. प्रत्येक खांबावर, छतावर, पायरीवर काही न काही रेखलेलं होतं. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर मध्यभागी एक मुख्य मंदिर होत आणि त्या मुख्य मंदिराच्या चारी बाजूला 40 ते 50 छोटी छोटी मंदिरं वजा खोल्या होत्या. मी प्रत्येक मंदिराजवळून फेरी मारली. आणि खरं सांगू मला या देवांचीच मनापासून कीव आली. कारण, या अश्या बंदिस्त खोल्या, त्याला असलेलं (कुलूपबंद) छोटसं दार, त्या दारातून हार, फुल किंवा नैवद्य देण्यासाठी असलेली छोटी फट.. हा तर सरळ सरळ तुरुंगच..!! एकीकडे बाहेर धरणाचं छान पाणी, मोकळी हवा, मोकळं आभाळ होतं आणि दुसरीकडे देव मात्र इवल्या इवल्या खिडकी नसलेल्या खोल्यात बंद होते. "काय रे देवा... !"
आजूबाजूची लोकं प्रत्येक खोलीसमोर जाऊन डोकं टेकत होती, काही बाही पुटपुटत होती.
मी मात्र शांत होतो.
निघताना मात्र न राहवून साऱ्या देवांना मनापासून म्हटलं, "God bless you..!!"
आजूबाजूची लोकं प्रत्येक खोलीसमोर जाऊन डोकं टेकत होती, काही बाही पुटपुटत होती.
मी मात्र शांत होतो.
निघताना मात्र न राहवून साऱ्या देवांना मनापासून म्हटलं, "God bless you..!!"
मंदिरातून निघायला आम्हाला 10.30 वाजले होते. पुढचा टप्पा होता - 'वृंदावन गार्डन' मंदिरापासून साधारण 15km अंतर. आणि त्यात आता ऊन बऱ्यापैकी वाढलं होत. त्यामुळे सायकल चालवण हळूहळू जीवावर यायला लागलं होतं. त्यात तो गाईड नुस्ता गुपचूप पुढं सायकल चालवत राहायचा. काहीच बोलतबिलत नसायचा. त्यामुळे अजूनच बोअर व्हायला लागलं होतं. पण तरीही माझं जमेल तसं पेडलिंग चालूच होत. वृंदावन गार्डन बद्दल बरच ऐकलं होतं मी, गूगल बाबाने ने देखील बरच सांगितलं होतं. पण जेव्हा मी तिथे पोहचलो तेव्हा मला त्यातलं काही काही आठवत नव्हतं. मला दिसत होती फक्त झाडं, सावली, हवा आणि बसायला जागा. मी गार्डन मध्ये गेल्या गेल्या हिरव्या गवतावर बसकन मांडली. आणि पुढचा अर्धा तास काही तिथून हललो नाही. सायकल चालवून चालवून पार्श्वभाग दुखायला लागला होता पण गवतावर बसल्यामुळे त्याला जरा अराम मिळाला. तासभर आराम केल्यावर मी गाईडला सांगितलं "नाव्वू नो मोर विजीटस, लेट्स गो टू हॉस्टेल्ल.." कारण, दुपारच्या रखरखत्या उन्हाची मला पुरेपूर कल्पना आली होती. आणि ते अजून त्रास देण्याआधी मी हॉस्टेल पोहचायचं पक्क केलं होतं. तिथून हॉस्टेल होत जवळ जवळ २० ते २५ कि.मी. म्हणजे साधारण तास दीडतास. (म्हणजे दीड तास उन्हात सायकलिंग) पण दुसरा काही पर्याय नव्हता. मी गियर्स वाढवून जमेल तितकं स्वतःला push करीत होतो. आणि गाईड ची अजिबात फिकीर न करता मला हवा तेव्हा ब्रेक घेत होतो. कारण, मला माहित होत की, हि कुठलीही रेस नव्हती आणि माझी कुणासोबतही स्पर्धा नव्हती. त्यामुळे i took my time. साधारण, दुपारी 1 वाजता मी हॉस्टेल गाठलं आणि स्वतःला लगेचच बेडच्या हवाली केलं.
जेवणानंतर finally मैसूरची शान, 'मैसूर पॅलेस' पाहायचं ठरवलं.
वेड्यासारखं भटकायचं असेल तर स्वभाव 'फिरस्ती' हवा. पण, एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जायचं असेल तर थोडा का असेना पण 'अभ्यास' हवा. आणि माझा काही तितकासा अभ्यास नव्हता. पूर्ण पॅलेस फिरलो.. भारी वाटलं.. छान फोटोग्राफी केली.. पण इतिहासाचे संदर्भ काही लागले नाहीत. पण इतिहासाच्या भव्यतेची पुरेपूर कल्पना आली. प्रत्येक दालन, प्रत्येक खिडकीमध्ये इतकी नजाकत आहे की अफलातून..!! पॅलेस पाहिल्यानंतर लगेचच हॉस्टेल गाठलं. सायकल युथ हॉस्टेल च्या ताब्यात दिली. कारण, पॅलेस ची "शाही" ride हि माझी मैसूर दौऱ्यातली मधली शेवटची ride होती. आज YHAI सोबतचा मैसूर दौऱ्यातला शेवटचा दिवस होता.
पण मैसूर दौरा अजून बाकी आहे..
कारण, या फिरस्तीकडे अजून एक कोरा करकरीत दिवस बाकी आहे...
मै सू र डा य री चा... मैसूर फिरस्तीचा..
Tag cloud
#MysoreDiary
#MarathiGypsy
#cyclinginmysore
#youthhostel
www.firasti.in
Great!!! मनाला तुझे लिखाण खूप लळा लावते..आणि वाचतच राहावे असे वाटते...
ReplyDeleteKhoop mast. Keep it up.
ReplyDelete💛💛💛
ReplyDeleteAs usual stunning photos. And of course your flowing writing which takes every reader there.
ReplyDeleteThank You very much sir.. ☺️
Deleteमस्तच आनंद. तुझ्या म्हयसुरच्या प्रवासाचं वर्णन खरच आनंद देऊन गेला. तुझं लिखाण वाचून तुझा ६ दिवसाचा प्रवास 2 तासाभरात अनुभवून झाला. प्रवास चालूच राहूदे. शुभेच्छा 💐
ReplyDelete